धानोरा जिल्हा परिषद शाळा व प्राथमिक आरोग्य केंद्राला मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांची अचानक भेट

धानोरा जिल्हा परिषद शाळा व प्राथमिक आरोग्य केंद्राला मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांची अचानक भेट
विद्यार्थ्यांकडून गिरवून घेतले धडे; निपुण तासिकेचा घेतला आढावा
जळगाव/प्रतिनिधी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांनी शुक्रवार, दि. १७ जुलै रोजी चोपडा तालुक्यातील धानोरा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व प्राथमिक आरोग्य केंद्राला अचानक भेट देऊन शिक्षण व आरोग्य सेवांचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांच्याकडून अभ्यासक्रमातील धडे गिरवून घेतले तसेच निपुण तासिकेच्या अंमलबजावणीची पाहणी केली.
धानोरा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला भेटीदरम्यान मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांनी शाळेच्या परिसरातील स्वच्छतेची पाहणी केली. तसेच शिक्षकांकडून अध्यापनाची पद्धत, शिकविले जाणारे विषय आणि विद्यार्थ्यांच्या प्रगतीची माहिती जाणून घेतली. विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधत त्यांनी अभ्यासक्रमातील विविध धड्यांची उजळणी करून घेतली. विद्यार्थ्यांनी दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाचे त्यांनी कौतुक केले.
जिल्हा परिषद शाळांमध्ये नियमितपणे घेण्यात येणाऱ्या निपुण तासिकेचाही त्यांनी आढावा घेतला. विद्यार्थ्यांच्या भाषा व गणित विषयातील मूलभूत कौशल्यांच्या विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी होत असल्याची खात्री करून घेत त्यांनी विद्यार्थ्यांशी हितगुज केले.
यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांनी धानोरा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देऊन स्वच्छता, औषधसाठा, रुग्णांना उपलब्ध करून दिल्या जाणाऱ्या सुविधा तसेच आरोग्य सेवांच्या गुणवत्तेची पाहणी केली. ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार व वेळेवर आरोग्य सेवा उपलब्ध व्हाव्यात, औषधांचा पुरेसा साठा कायम ठेवावा, स्वच्छतेला सर्वोच्च प्राधान्य द्यावे आणि कोणत्याही परिस्थितीत औषधांची कमतरता भासू देऊ नये, अशा सूचना त्यांनी आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांना दिल्या.
यावेळी शिक्षकांनाही त्यांनी मार्गदर्शन करत विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी अधिक सक्रिय भूमिका घेण्याचे आवाहन केले. प्रत्येक विद्यार्थ्याच्या शैक्षणिक प्रगतीवर सातत्याने लक्ष ठेवून त्यांच्यातील मूलभूत कौशल्यांचा विकास करण्यासाठी निपुण भारत अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
अचानक केलेल्या या भेटीमुळे शाळा व प्राथमिक आरोग्य केंद्रातील कामकाजाचा प्रत्यक्ष आढावा घेत प्रशासनातील उत्तरदायित्व अधिक बळकट करण्यावर भर देण्यात आला.






