Other

भुसावळ-वरणगाव महामार्गावरील अपघात रोखण्यासाठी तातडीने उपाययोजना करा

भुसावळ-वरणगाव महामार्गावरील अपघात रोखण्यासाठी तातडीने उपाययोजना करा

वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे

रेल्वे हद्दीतील विकास कामे, अतिक्रमण व पुनर्वसनाबाबत बैठकीत विशेष आढावा

जळगाव भुसावळ-वरणगाव महामार्गावरील अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी तातडीने आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, वाहतूक नियमन, रस्त्यावरील सुरक्षाव्यवस्था तसेच शहरातील विविध समस्यांबाबत वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेण्यात आली. यावेळी संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा करून त्यांना आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या.

बैठकीस जिल्हाधिकारी रोहन घुगे, भुसावळ विभागीय रेल्वे सह व्यवस्थापक राजेंद्र देशपांडे, भुसावळ नगरपरिषद अध्यक्षा शैलजा नारखेडे, निवासी उपजिल्हाधिकारी वैशाली चव्हाण, नगरपरिषद विविध विभागांचे सभापती, नगरसेवक, प्रांताधिकारी जितेंद्र पाटील, तहसीलदार लीना नवाडे, मुख्याधिकारी विवेक धांडे तसेच पोलीस, परिवहन, महामार्ग व अन्य संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

मंत्री श्री सावकारे म्हणाले,भुसावळ-वरणगाव महामार्गावरील अपघातप्रवण ठिकाणांची पाहणी करून आवश्यक त्या सुरक्षात्मक उपाययोजना तातडीने कराव्यात, अशा सूचना मंत्री संजय सावकारे यांनी पोलीस, परिवहन आणि राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या. वाहतूक नियमन अधिक प्रभावी करणे, धोकादायक ठिकाणी आवश्यक सुरक्षा व्यवस्था करणे, दिशादर्शक व सुरक्षाविषयक फलक लावणे तसेच रस्त्यावरील इतर अडचणी दूर करण्याबाबतही यावेळी चर्चा करण्यात आली.
*रेल्वे हद्दीतील विकास कामे, अतिक्रमण व पुनर्वसनाबाबत मंत्री श्री सावकारे यांनी घेतला आढावा*
भुसावळ शहरातील रस्ते, वाहतूक व्यवस्था, रेल्वे हद्दीतील जागा, नागरी सुविधा तसेच पाणीपुरवठा व स्वच्छतेशी संबंधित विविध प्रश्न तातडीने मार्गी लावावेत, अशा सूचना मंत्री संजय सावकारे यांनी संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांना दिल्या. बसस्थानक ते वरणगाव रोड जोडणाऱ्या मार्गाचा विकास, वरणगाव रोडचे रुंदीकरण, बाजारपेठ ते अमर स्टोअर्स मार्गाचे रुंदीकरण, बस डेपो मार्गावरील वाहतूक नियोजन तसेच नवीन रस्त्यांच्या नियोजनाबाबत आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

रेल्वे प्रशासनाच्या समन्वयातून रस्ते विकासासाठी आवश्यक जागेची परवानगी व ना-हरकत प्रमाणपत्र तातडीने मिळवावे, तसेच थकीत सर्व्हिस चार्जेस व अग्निशमन सेवांच्या शुल्काबाबत रेल्वेकडे अधिकृत मागणी नोंदवावी, असेही मंत्री सावकारे यांनी सांगितले. शहरातील कचरा डम्पिंगचे ब्लॅक स्पॉट हटविणे, नालेसफाई, घनकचरा व्यवस्थापन, भूमिगत गटार योजना, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प, सीसीटीव्ही कॅमेरे, रिक्षा थांब्यांचे नियोजन आणि बसस्थानकाच्या स्वच्छता व दुरुस्तीची कामे प्राधान्याने पूर्ण करण्याच्या सूचनाही मंत्री श्री सावकारे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
***********

 

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button