Other

‘उमेद – उद्याची पहाट २०२६’ : बालविधीसंघर्षग्रस्त मुलांना नवी दिशा देणारा जळगाव पोलिसांचा अभिनव उपक्रम

‘उमेद – उद्याची पहाट २०२६’ : बालविधीसंघर्षग्रस्त मुलांना नवी दिशा देणारा जळगाव पोलिसांचा अभिनव उपक्रम

१५० हून अधिक मुलांचा सहभाग; पुनर्वसन, समुपदेशन आणि मुख्य प्रवाहात आणण्यासाठी जिल्हास्तरीय कार्यशाळा संपन्न

जळगाव | प्रतिनिधी

समाजात कायदा व सुव्यवस्था राखण्याबरोबरच गुन्हेगारीचे प्रमाण कमी करणे आणि चुकीच्या मार्गावर गेलेल्या बालकांना नवजीवन देणे या उद्देशाने जळगाव जिल्हा पोलीस दलाने ‘उमेद – उद्याची पहाट २०२६’ या अभिनव उपक्रमांतर्गत शनिवारी (२ ऑगस्ट) पोलीस मुख्यालयातील पद्मालय हॉल येथे जिल्हास्तरीय पुनर्वसन कार्यशाळेचे आयोजन केले. या कार्यशाळेचे उद्घाटन मुख्य जिल्हा न्यायाधीश यांच्या हस्ते करण्यात आले.

जिल्ह्यात प्रथमच अशा स्वरूपाची व्यापक पुनर्वसन कार्यशाळा आयोजित करण्यात आली असून, १५० हून अधिक बालविधीसंघर्षग्रस्त (Juveniles in Conflict with Law) मुलांनी या उपक्रमात सहभाग घेतला. या मुलांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणे, त्यांच्यामध्ये सकारात्मक विचार रुजविणे, गुन्हेगारीपासून कायमस्वरूपी दूर ठेवणे आणि जबाबदार नागरिक म्हणून घडविणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता.

तज्ज्ञांचे मार्गदर्शन; जीवनाला नवी दिशा

कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनासाठी विविध स्वयंसेवी संस्थांनी सक्रिय सहभाग नोंदविला. केशव स्मृती प्रतिष्ठानचे भरत अमळकर तसेच आधार संस्थेच्या विद्या सोनार यांच्यासह विविध तज्ज्ञांनी मुलांशी संवाद साधत व्यक्तिमत्त्व विकास, जीवनकौशल्ये, शिक्षणाचे महत्त्व, व्यसनमुक्ती, कौटुंबिक नातेसंबंध, सामाजिक जबाबदारी आणि आत्मविश्वास वाढविणे या विषयांवर मार्गदर्शन केले.

समुपदेशनाच्या माध्यमातून मुलांच्या मनातील भीती, संभ्रम आणि नकारात्मक विचार दूर करून त्यांच्यात नवे स्वप्न पाहण्याची आणि नव्याने उभे राहण्याची प्रेरणा निर्माण करण्यात आली.

वाहतूक, नोंदणी आणि पुढील पाठपुरावा

सहभागी मुलांच्या सुरक्षित आणि सुलभ प्रवासासाठी जळगाव पोलिसांनी शालेय बसची व्यवस्था केली होती. प्रत्येक मुलाची स्वतंत्र नोंदणी करून त्यांच्या वैयक्तिक परिस्थितीनुसार पुनर्वसन आणि समुपदेशनाचा आराखडा तयार करण्यात आला.

या उपक्रमाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे कार्यशाळेनंतरही स्थानिक पोलीस ठाण्यांच्या माध्यमातून प्रत्येक मुलाचा सातत्याने पाठपुरावा केला जाणार आहे. स्वयंसेवी संस्था, पालक, शैक्षणिक संस्था आणि प्रशासन यांच्या समन्वयातून शिक्षण, कौशल्यविकास, रोजगार, समुपदेशन आणि सामाजिक पुनर्वसनासाठी आवश्यक ते सहकार्य उपलब्ध करून दिले जाणार आहे.

विद्यार्थ्यांना हॅवरसॅक बॅगचे वाटप

या उपक्रमात सहभागी झालेल्या सर्व मुलांना हॅवरसॅक बॅगचे वितरण करण्यात आले. या बॅगचे प्रायोजकत्व राजेंद्र यवले यांनी केले.

सामाजिक परिवर्तनाकडे टाकलेले महत्त्वाचे पाऊल

जळगाव पोलीसांचा हा उपक्रम केवळ गुन्हेगारी नियंत्रणापुरता मर्यादित नसून, चुकीच्या मार्गावर गेलेल्या मुलांना समाजात सन्मानाने जगण्याची नवी संधी देणारा ठरत आहे. गुन्हेगार निर्माण होऊ नयेत, त्याऐवजी जबाबदार, सशक्त आणि कायद्याचा आदर करणारे नागरिक घडावेत, हीच या उपक्रमामागील प्रेरणा असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले.

“कुछ नहीं तो कम से कम,
ख़्वाब-ए-सहर तो देखा है…
जिस तरफ़ किसी ने देखा न था,
हमने उस तरफ़ देखा तो है.”

 

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button