Other

कावड यात्रेत काळाचा घाला : आयशरच्या धडकेत बालक ठार, संतप्त जमावाने वाहन पेटवले

ममुराबाद रोडवर अपघातानंतर संतापाचा उद्रेक; चालकाला चोप, जमावाकडून रास्ता रोको

महा पोलीस न्यूज । चेतन वाणी । कावड यात्रेचा उत्साह सुरू असतानाच काळाने एका निष्पाप चिमुकल्याचा घास घेतला. जळगाव शहरातील ममुराबाद रोडवर झालेल्या भीषण अपघातात भरधाव आयशरच्या धडकेत अवघ्या १० वर्षीय प्रबल राजू गवळी (रा.गवळीवाडा, शनिपेठ, जळगाव) याचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. सोमवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास घडलेल्या या घटनेनंतर परिसरात संतापाचा उद्रेक झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, एमएच.२०.ईजी.३५९३ क्रमांकाच्या आयशर वाहनाची प्रबलला धडक बसली. या वाहनातून जळगाव ते चोपडा मार्गावर किराणामाल व रेशनची वाहतूक केली जात असल्याची माहिती आहे. वाहन मालकाचे नाव भूपेंद्र नटवरलाल गुजराती असे आहे. या प्रकरणात वाहन चालक उबेद खान इकबाल खान पठाण (वय ३४, रा. चोपडा) याला संशयीत आरोपी करण्यात आले असून, त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

चिमुकल्याचा मृत्यू अन् संतापाचा उद्रेक
प्रबलच्या मृत्यूची माहिती समोर येताच घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली. निष्पाप मुलाचा मृत्यू डोळ्यांसमोर पाहून नागरिकांचा संताप अनावर झाला. संतप्त जमावाने अपघातास कारणीभूत ठरलेल्या आयशरला आग लावली. तसेच चालकाला मारहाण झाल्याची माहिती आहे. अपघातानंतर घटनास्थळी मोबाईलवर शूटिंग करणाऱ्या काही तरुणांनाही जमावाने मारहाण केल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे काही काळ परिस्थिती अत्यंत तणावपूर्ण बनली होती.

मृतदेह रस्त्यावर ठेवून रास्ता रोको
प्रबलचा मृतदेह रस्त्यावर ठेवून संतप्त नागरिकांनी रास्ता रोको सुरू केला. संबंधित चालकावर कठोर कारवाई करावी, दोषींना कायद्याच्या कठोर कक्षेत आणावे, अशी मागणी करण्यात आली. रास्ता रोकोमुळे ममुराबाद रोडवरील वाहतूक दोन्ही बाजूंनी ठप्प झाली. दरम्यान, पेटलेल्या वाहनाची आग विझवण्यासाठी अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. मात्र, जमावाच्या संतापामुळे अग्निशमन दलाला बराच वेळ वाट पाहून परतावे लागले.

आरोपीला मारहाण; रुग्णालयात पोलिसांचा कडक बंदोबस्त
अपघातानंतर संतप्त जमावाकडून चालक उबेद खान पठाण याला मारहाण झाल्याची माहिती आहे. त्यामुळे त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्याच्यावर पोलिस गार्ड तैनात करण्यात आला आहे. दरम्यान, आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. प्रबलचा मृतदेह पुढील वैद्यकीय प्रक्रियेसाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (सिव्हिल) हलविण्यात आला आहे.

पोलिस अधीक्षक स्वतः मैदानात; बायपासचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी परिस्थितीवर लक्ष ठेवत संबंधित यंत्रणांशी संपर्क साधला. त्यांनी NHAI आणि PWD अधिकाऱ्यांशी चर्चा करून वाहतूक सुरळीत करण्याबाबत तसेच महामार्ग लवकर खुला करण्याच्या उपाययोजनांबाबत चर्चा केल्याची माहिती आहे. मात्र, NHAI कडून मिळालेल्या माहितीनुसार संबंधित महामार्ग आणखी सुमारे दीड महिना खुला होण्याची शक्यता नसल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे शहरातील पर्यायी मार्गांवर वाढलेला वाहतुकीचा ताण आणि त्यातून निर्माण होणाऱ्या अपघातांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

२६ ऑगस्टला अधिकाऱ्यांची संयुक्त पाहणी
दरम्यान, २६ ऑगस्ट रोजी सायंकाळी ४ वाजता जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, NHAI अधिकारी तसेच जाणकार पत्रकार संयुक्तपणे शहरातील सर्व बायपास वाहतुकीची पाहणी करणार आहेत. वाहतुकीची सद्यस्थिती, अपघातप्रवण ठिकाणे, पर्यायी मार्ग आणि नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना याबाबत पाहणी केली जाणार आहे. प्रबलच्या मृत्यूने केवळ एका कुटुंबाचा आधार हिरावला नाही, तर शहरातील वाहतूक व्यवस्थेतील धोकादायक परिस्थितीवरही गंभीर प्रश्नचिन्ह उभे केले आहे.

आनंदाची कावड यात्रा क्षणात बनली आक्रोशाची
कावड यात्रेत सहभागी झालेला प्रबल काही वेळापूर्वीपर्यंत आनंदात होता. मात्र, भरधाव वाहनाच्या धडकेने त्याचा निष्पाप जीव गेला आणि संपूर्ण परिसरात एकच आक्रोश पसरला. प्रबलच्या पश्चात आई, बहीण आणि दूध व्यवसाय करणारे वडील असा परिवार आहे. दहा वर्षांच्या चिमुकल्याचा असा दुर्दैवी अंत झाल्याने गवळीवाड्यासह संपूर्ण परिसरावर शोककळा पसरली आहे.

 

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button