Other

अडावदमध्ये विद्यार्थ्यांसाठी सायबर गुन्हे व मुलींच्या सुरक्षिततेबाबत जनजागृती

अडावदमध्ये विद्यार्थ्यांसाठी सायबर गुन्हे व मुलींच्या सुरक्षिततेबाबत जनजागृती

शामराव येशो महाजन विद्यालयात अडावद पोलिसांचा उपक्रम; POCSO कायदा, ‘गुड टच-बॅड टच’ व सायबर फसवणुकीबाबत मार्गदर्शन

अडावद | प्रतिनिधी

अडावद पोलीस ठाण्याच्या वतीने अडावद येथील शामराव येशो महाजन विद्यालयात ‘सायबर क्राईम’ आणि ‘मुलींची सुरक्षितता व कायदेशीर हक्क’ या विषयांवर जनजागृती व मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थी, विद्यार्थिनी, शिक्षक आणि कर्मचाऱ्यांनी या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

दि. ३१ जुलै २०२६ रोजी दुपारी १२.३० ते १.३५ या वेळेत झालेल्या कार्यक्रमात उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील (चोपडा विभाग), सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत कंडारे (अडावद पोलीस ठाणे) आणि महिला पोलीस कॉन्स्टेबल दिव्या मराठे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

सायबर गुन्ह्यांपासून बचावाचे धडे

मार्गदर्शनादरम्यान ऑनलाईन आर्थिक फसवणूक, सोशल मीडियाचा गैरवापर, बनावट लिंक, संशयास्पद फोन कॉल आणि डिजिटल फसवणुकीचे विविध प्रकार याविषयी सविस्तर माहिती देण्यात आली. अशा गुन्ह्यांपासून स्वतःचे संरक्षण कसे करावे, याबाबतही विद्यार्थ्यांना महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या.

मुलींच्या सुरक्षिततेवर विशेष भर

मुलींच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने ‘गुड टच – बॅड टच’, POCSO कायदा, महिला सुरक्षेसंदर्भातील कायदे तसेच कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत ११२ (आपत्कालीन प्रतिसाद) आणि १९३० (सायबर हेल्पलाईन) या क्रमांकांवर त्वरित संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले.

टवाळखोरी करणाऱ्यांना इशारा

शाळा परिसरात मुलींची छेडछाड, टवाळखोरी किंवा कोणत्याही प्रकारचे असभ्य वर्तन सहन केले जाणार नसून अशा अपप्रवृत्तींवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा पोलिसांनी दिला.

पालक-शिक्षकांनीही सतर्क राहावे

विद्यार्थ्यांच्या मोबाईल वापरावर पालक आणि शिक्षकांनी लक्ष ठेवावे तसेच त्यांच्या सुरक्षिततेबाबत जागरूक राहून योग्य मार्गदर्शन करावे, असे आवाहन अडावद पोलीस ठाण्याच्या वतीने करण्यात आले.

 

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button