ॲड.पियुष पाटील यांच्या लढ्याने वाचला जळगाव मनपाचा मौल्यवान भूखंड!

महा पोलीस न्यूज । चेतन वाणी । जळगाव शहराच्या मध्यभागी, इंडियन रेड क्रॉस सोसायटी आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या शेजारी असलेला जळगाव महानगरपालिकेचा (मनपा) खुला भूखंड अतिक्रमणाच्या धोक्यात सापडला होता. हा भूखंड पूर्वी नर्सिंग कॉलेजसाठी सिव्हिल हॉस्पिटलला दिला गेला होता, पण विकास न झाल्याने मनपाने तो पुन्हा ताब्यात घेतला. सामाजिक कार्यकर्ते व वकील ॲड. पियुष नरेंद्र अण्णा पाटील यांनी तात्काळ लेखी तक्रार देऊन भूखंड पुन्हा मिळवला आहे.
रात्रीच्या काळोखात भिंत उद्ध्वस्त
रात्रीतून संरक्षण भिंत तोडून जेसीबी मशीन घुसवण्याचा प्रयत्न झाला, जो पार्किंगसाठी जागा हडपण्याचा प्रकार होता. ॲड.पाटील यांच्या आक्रमक भूमिकेमुळे वैद्यकीय महाविद्यालय आणि रेडक्रॉस सोसायटीला माघार घ्यावी लागली. मनपाच्या उपस्थितीत ताबा बोर्ड लावण्यात आला, यावेळी जोरदार वादही झाला.
१० वर्षांपूर्वीचा जुना डाव?
१० वर्षांपूर्वीही रेड क्रॉसने रात्री लोगो असलेले गेट लावून मनपा बोर्ड तोडण्याचा प्रयत्न केला होता. तेव्हा सामाजिक कार्यकर्ते दिलीप सुरवाडे यांच्या लढ्यामुळे हा डाव अयशस्वी ठरला. आता पुन्हा असाच प्रकार घडला, त्यामुळे आम्हाला पुढाकार घ्यावा लागला असे ॲड.पाटील यांनी सांगितले.
विना परवाना बांधकामाचा प्रकार
मनपा ताब्यातील जागेवर विना टेंडर, विना नाहरकत PWD मार्फत भिंत बांधण्यात आली. ॲड. पाटील यांनी गुन्हा दाखल करण्यासाठी महापौरांना निवेदन दिले आहे. महाविद्यालय प्रशासनाने पार्किंगसाठी फक्त वापर असा दावा केला, पण ॲड. पाटील यांनी स्पष्ट सांगितले की मनपा जागा सर्वांसाठी खुली राहील.
पारिवारिक लढ्याची परंपरा
ॲड.पाटील हे स्व.नरेंद्र अण्णा पाटील यांचे पुत्र असून, त्यांनीही मनपा भूखंड बिल्डरांकडून वाचवले होते. गणेशवाडी बाग आणि पोलीस स्टेशन शेजारची पार्किंग जागा त्यांच्या न्यायालयीन लढ्यामुळे वाचली. हीच परंपरा ॲड.पियुष पाटील यांनी पुढे चालवली.
मनपाच्या प्रयत्नांना बळ
मनपाने जेसीबी घेऊन ताबा घेण्याचा प्रयत्न केला, पण काहींनी कोर्ट ऑर्डरचा खोटा दावा करून रोखले. ॲड.पाटील यांनी कागदपत्रे दाखवून युक्तिवाद करून मनपेची बाजू भक्कम केली. प्रसंगी मनपा नगररचनाकार अमोल पाटील व अभियंते उपस्थित होते.






