
दुष्काळाच्या झळा कमी करण्यासाठी गावोगावी जलसंधारणाची कामे उभारणार!’ – पालकमंत्री गुलाबराव पाटील
अहिरे खुर्द–बुद्रुकला जोडणारा सात कोटींचा पूल पूर्णत्वाकडे; लवकरच लोकार्पणाची पालकमंत्र्यांची ग्वाही
जळगाव: यंदाच्या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना तातडीच्या मदतीसोबतच भविष्यातील पाणीटंचाईवर कायमस्वरूपी उपाययोजना करणे गरजेचे आहे. त्यासाठी जिल्ह्यात बंधारे, नालाखोलीकरण व भूजल पुनर्भरणाच्या कामांना प्राधान्य दिले आहे. अहिरे खुर्द येथील बंधाऱ्यासह नऊ गेटेड सिमेंट बंधाऱ्यांची कामे सुरू असून, त्यामुळे पाणीसाठा वाढण्यासह विहिरींची पाणीपातळी सुधारण्यास मदत होईल. या कामांसाठी निधी कमी पडू देणार नाही. तसेच साठवण बंधाऱ्यांना आवश्यक फळ्या बसविण्यासाठी दोन कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देणार आहोत. शासनाच्या प्रयत्नांना लोकसहभागाची जोड देत ग्रामस्थांनी वनराई बंधारे उभारण्यासाठी पुढाकार घ्यावा. गावातील पाणी गावातच अडवून दुष्काळाच्या झळा कमी करूया, असे आवाहन राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.*
धरणगाव तालुक्यातील अहिरे खुर्द येथे जिल्हा जलसंधारण महामंडळांतर्गत अंजनी नदीवरील सुमारे ९३ लाख रुपये खर्चाच्या गेटेड सिमेंट बंधाऱ्याचे भूमिपूजन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. पालकमंत्र्यांच्या स्वागतासाठी ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती. कार्यक्रमस्थळी यात्रेसारखी गर्दी उसळल्याने गावात उत्साहाचे वातावरण होते. गावापासून नदीपात्रातील भूमिपूजनस्थळापर्यंत सुमारे एक किलोमीटरचा प्रवास पालकमंत्र्यांनी ट्रॅक्टरमधून केला. त्यामुळे त्यांची ही ट्रॅक्टर सफरही ग्रामस्थांच्या चर्चेचा विषय ठरली.
*सात कोटींचा पूल पूर्णत्वाकडे; लवकरच लोकार्पण*
यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी परिसरातील विकासकामांची माहिती देताना सांगितले की, अहिरे खुर्द आणि अहिरे बुद्रुक या दोन्ही गावांना जोडणाऱ्या सुमारे सात कोटी रुपये खर्चाच्या पुलाचे ९० टक्क्यांहून अधिक काम पूर्ण झाले आहे. उर्वरित काम पूर्ण होताच या पुलाच्या लोकार्पणासाठी पुन्हा येणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली. तसेच भवरखेडा–पळासखेडा रस्त्यावरील पुलासाठी दोन कोटी, सोनवद–खर्दे मार्गावरील पुलांच्या कामांसाठी एक कोटी २० लाख आणि पाळधी–झुरखेडा–दहिदुल्ला मार्गावरील विहीरफाट्याजवळील पुलासाठी ८० लाख, अशा एकूण चार कोटीची कामे सध्या निविदा प्रक्रियेत असून, प्रक्रिया पूर्ण होताच प्रत्यक्ष कामांना सुरुवात करण्यात येईल. या पुलांमुळे नागरिकांचा प्रवास अधिक सुरक्षित व सुलभ होईल, असेही पालकमंत्र्यांनी सांगितले.
*अहिरेत ट्रॅक्टरची सफर; स्टेअरिंगवरून राजकीय कोपरखळी !*
अहिरे खुर्द येथे बंधाऱ्याच्या भूमिपूजनासाठी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी ट्रॅक्टरमधून नदीपात्राकडे प्रवास केला. ट्रॅक्टरचे स्टेअरिंग भाजपचे भगवान महाजन यांच्या हाती होते, तर पालकमंत्री त्यांच्या शेजारी बसले होते. ट्रॉलीमध्ये पदाधिकारी व कार्यकर्तेही सहभागी झाले होते. यावेळी *‘महाराष्ट्राचे स्टेअरिंग भाजपकडेच!’* अशी मिश्कील टिप्पणी होताच उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. विकासकामाच्या निमित्ताने घडलेला हा राजकीय मिश्कीलपणाचा प्रसंगही चर्चेचा विषय ठरला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जलसंधारण विभागाचे उपअभियंता अमोल पाटील यांनी केले. सूत्रसंचालन युवासेनेचे पवन पाटील यांनी केले, तर आभार पोलीस पाटील सुरेश चव्हाण यांनी मानले.
यावेळी, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील, तालुकाप्रमुख डी. ओ. पाटील, अहिरे येथील पवन पाटील, अजय पाटील,रवी चव्हाण, पोलीस पाटील सुरेश चव्हाण, संजय पाटील सर, भगवान महाजन, पी. सी. पाटील, माजी सभापती मुकुंदराव नन्नवरे, प्रेमराज पाटील, भैय्या मराठे यांच्यासह विविध पक्षांचे पदाधिकारी, आजी – माजी लोकप्रतिनिधी, शेतकरी, महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.







