५६ चिमुकल्यांच्या कलाविष्काराने रंगला ‘स्वानंदोत्सव’; विशेष गरजूंच्या नृत्याला उभे राहून दाद

५६ चिमुकल्यांच्या कलाविष्काराने रंगला ‘स्वानंदोत्सव’; विशेष गरजूंच्या नृत्याला उभे राहून दाद
जळगाव : भाऊंचे उद्यान आणि काव्यरत्नावली चौक परिसर रविवारच्या सायंकाळी चिमुकल्यांच्या हास्य, सूर आणि तालाने दुमदुमून गेला. निमित्त होते ‘स्वानंद कलायात्री’ आणि ‘स्वरवेध फाउंडेशन’ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘स्वानंदोत्सव २०२६’ चे. विशेष गरजू मुलांच्या आत्मविश्वासपूर्ण नृत्याने उपस्थितांची मने जिंकली आणि प्रेक्षकांनी उभे राहून टाळ्यांच्या कडकडाटात त्यांचे कौतुक केले.
महापौर दीपमाला काळे आणि कोटक इन्शुरन्सचे नामदेव शिंपी यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी संस्थेतर्फे महापौर काळे यांचा सत्कार करण्यात आला. विशेष म्हणजे, औपचारिक उद्घाटनानंतर संपूर्ण व्यासपीठाची सूत्रे चिमुकल्यांच्याच हाती होती.
गायन, नृत्य, वादन, विविध कलागुणदर्शन आणि सूत्रसंचालन अशा सर्वच आघाड्यांवर ३ ते १८ वयोगटातील तब्बल ५६ मुलांनी आपल्या अदाकारीने जळगावकरांना खिळवून ठेवले. कुठेही मोठ्यांची लुडबूड नसताना मुलांनी सांभाळलेले व्यवस्थापन आणि सादरीकरण हे यंदाच्या महोत्सवाचे वेगळेपण ठरले.
हृदयरोगग्रस्त लहान मुलांना आर्थिक मदत मिळावी, यासाठी केवळ जनजागृती व आवाहन करण्याचे काम २००७ पासून ‘स्वानंद कलायात्री’ करत आहे. संस्था स्वतः कोणताही निधी संकलित करत नाही. त्यासोबतच स्थानिक बालकलाकारांना हक्काचे व्यासपीठ देऊन स्वतःच्या आनंदासह इतरांना आनंद देण्याचा संस्थेचा प्रयत्न राहिला आहे.
जळगावकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या बालकलाकारांचे मनोबल उंचावले.







