Crime

दुष्काळाचा तडाखा आणि कर्जाचा फास; विदगावातील दिव्यांग शेतकऱ्याने संपवले जीवन

दुष्काळाचा तडाखा आणि कर्जाचा फास; विदगावातील दिव्यांग शेतकऱ्याने संपवले जीवन

जळगाव : नापिकीचा फटका, डोक्यावर वाढत जाणारा कर्जाचा बोजा आणि त्यातून निर्माण झालेली हतबलता… यातून विदगाव (ता. जळगाव) येथील दिव्यांग शेतकरी गजानन पद्माकर पाटील (वय ४८) यांनी राहत्या घरी गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली. २१ नोव्हेंबर रोजी रात्री ही काळीज पिळवटून टाकणारी घटना घडली. या प्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली असून, घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

शरीराने दिव्यांग असूनही गजानन पाटील यांनी कधीही हार मानली नव्हती. जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर ते शेती कसून कुटुंबाचा गाडा हाकत होते. शेतीच्या मशागतीसाठी आणि पेरणीसाठी त्यांनी कर्ज घेतले होते. मात्र, यंदा दुष्काळजन्य परिस्थितीने शेतीचे अतोनात नुकसान केले. हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेल्याने आणि घेतलेले कर्ज कसे फेडायचे, या विवंचनेतून ते गेल्या काही दिवसांपासून प्रचंड मानसिक तणावाखाली होते.

कर्जाची चिंता आणि आर्थिक कोंडी असह्य झाल्याने त्यांनी २१ नोव्हेंबर रोजी रात्रीच्या सुमारास राहत्या घरातच गळफास घेतला. हा प्रकार कुटुंबीयांच्या लक्षात येताच त्यांना तातडीने जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (जीएमसी) हलवण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले.

जगण्यासाठी धडपडणाऱ्या एका कष्टाळू व दिव्यांग शेतकऱ्याचा असा दुर्दैवी शेवट झाल्याने विदगावसह जळगाव तालुक्यात शोककळा पसरली आहे. पोलीस या प्रकरणाची पुढील चौकशी करत आहेत.

 

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button