मोठी बातमी : विधान परिषद निवडणुकीत अनिल चौधरी यांचा नंदू महाजनांना पाठिंबा!

महा पोलीस न्यूज । चेतन वाणी । जळगाव जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य प्राधिकरण विधान परिषद निवडणूक उद्या दि.१८ रोजी पार पडणार आहे. निवडणुकीच्या पूर्वसंध्येला अपक्ष उमेदवार अनिल छबिलदास चौधरी यांनी पत्रकार परिषद घेऊन सर्वांना मोठा धक्का दिला आहे. अनिल चौधरी यांनी भाजप महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांच्यासाठी थांबण्याचा निर्णय घेतला आहे. एकंदरीत चौधरी यांनी महाजन यांना पाठिंबा दिला आहे.
आज पत्रकार परिषदेत आ.किशोर आप्पा पाटील, शिवसेना जिल्हाध्यक्ष विष्णू भंगाळे, नगरसेवक बबन पोकळे आदी उपस्थित होते. परिषदेत अनिल चौधरी म्हणाले की, अगोदर मला माघारीसाठी मंत्री गिरीश महाजन यांनी फोन केला होता. काल मला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आ.बच्चू कडू यांचा फोन आला, त्यांनी मला थांबण्याचे त्यांनी सांगितले. नंदकिशोर महाजन हे देखील माझे मित्र असून त्यासाठी मी थांबलो आहे, असे त्यांनी सांगितले.
आ.किशोर अप्पा पाटील म्हणाले, आ.बच्चू कडू यांच्यावर विदर्भाची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यांनी काल अनिल चौधरी यांना फोन केला आणि मला देखील सांगितले. लवकरच अनिल चौधरी यांचा शिवसेनेत प्रवेश होणार आहे. आमचे नेते एकनाथ शिंदे आणि बच्चू कडू यांच्या आदेशानुसार मी आज अनिल चौधरी यांची भेट घेतली आणि महायुतीच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याचे सांगितले, अशी किशोर पाटील यांनी माहिती दिली.






