गिरणा नदीपात्रातील अवैध वाळू वाहतुकीवर धडक कारवाई; डंपरसह तीन ट्रॅक्टर जप्त

गिरणा नदीपात्रातील अवैध वाळू वाहतुकीवर धडक कारवाई; डंपरसह तीन ट्रॅक्टर जप्त
भडगाव | प्रतिनिधी
भडगाव शहरासह तालुक्यातील गिरणा नदीपात्रातून सुरू असलेल्या अवैध वाळू उपसा आणि वाहतुकीविरोधात पोलीस व महसूल विभागाने संयुक्तरित्या धडक कारवाई केली. या कारवाईत एक डंपर आणि तीन ट्रॅक्टर जप्त करण्यात आले असून चारही वाहने पुढील कारवाईसाठी महसूल विभागाच्या ताब्यात देण्यात आली आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, गिरणा नदीपात्रातून अवैधरित्या वाळू उपसा करून ती पाचोराकडे वाहतूक केली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार दि. १० जून रोजी रात्री भडगाव पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सुशील सोनवणे, पोलीस हवालदार निलेश ब्राह्मणकर आणि चालक एएसआय राजू पाटील यांच्या पथकाने गस्तीदरम्यान भडगाव-पाचोरा मार्गावर ग्रामीण रुग्णालयासमोर संशयास्पद डंपर अडविला.
पांढऱ्या-निळ्या रंगाच्या विनाक्रमांक डंपरची तपासणी केली असता त्यामध्ये अवैधरित्या वाळू वाहतूक केली जात असल्याचे आढळून आले. याप्रकरणी चालक सावकार रुपला पाटील (रा. पाचोरा) याच्यासह डंपर ताब्यात घेण्यात आला. त्यानंतर सदर वाहन पुढील दंडात्मक कारवाईसाठी तहसीलदार, भडगाव यांच्या ताब्यात देण्यात आले.
दरम्यान, महसूल विभागाच्या दोन स्वतंत्र पथकांनीही अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई करत तीन ट्रॅक्टर जप्त केले. कोठली परिसरातून अवैध वाळू वाहतूक करणारे दोन ट्रॅक्टर पकडून तहसील कार्यालयात जमा करण्यात आले. या कारवाईत दिनेश येंडे, समाधान हुल्लुळे, गीतेश महाजन, विवेक महाजन, योगेश पाटील, प्रशांत कुंभारे, महादू कोळी आणि किरण मोरे यांनी सहभाग घेतला.
तसेच टोनगाव परिसरातून आणखी एका ट्रॅक्टरवर कारवाई करण्यात आली. या पथकात एस. के. मांडोळे, व्ही. पी. शिंदे, लोकेश महाजन, करण कुलकर्णी, प्रसाद दुदुस्कर आणि गौरव पगारे यांचा समावेश होता.
दरम्यान, गिरणा नदीपात्रातील अवैध वाळू उपसा आणि वाहतूक रोखण्यासाठी पोलीस व महसूल विभागाने अशाच प्रकारच्या सातत्यपूर्ण कारवाया सुरू ठेवाव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. तालुक्यासह जिल्हाबाहेर होणारी अवैध वाळू वाहतूक कायमस्वरूपी बंद करण्यासाठी कठोर उपाययोजना करण्याची अपेक्षाही व्यक्त केली जात आहे.





