Politics

केळी उत्पादकांना दिलासा!

४ ते ५ दिवसांत पंचनामे पूर्ण करून नुकसानभरपाई द्या; कृषिमंत्र्यांचे विमा कंपन्यांना आदेश

केळी उत्पादकांना दिलासा!

४ ते ५ दिवसांत पंचनामे पूर्ण करून नुकसानभरपाई द्या; कृषिमंत्र्यांचे विमा कंपन्यांना आदेश

वादळी वारा आणि अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीवर मंत्रालयात विशेष बैठक; रावेर-मुक्ताईनगरसह जिल्ह्यातील शेतकऱ्यांना न्याय देण्याचे आश्वासन

जळगाव, प्रतिनिधी : जळगाव जिल्ह्यातील रावेर, मुक्ताईनगरसह विविध तालुक्यांमध्ये अलीकडेच झालेल्या वादळी वारा आणि अवकाळी पावसामुळे केळी पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी हे नुकसान शंभर टक्क्यांपर्यंत पोहोचल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. या पार्श्वभूमीवर १० जून रोजी मंत्रालयात आयोजित विशेष बैठकीत राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी विमा कंपन्यांच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरत तातडीने पंचनामे पूर्ण करून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्याचे आदेश दिले.

विमा कंपन्यांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह

या बैठकीला जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, आमदार चंद्रकांत पाटील आणि आमदार अमोल जावळे उपस्थित होते. बैठकीत विमा कंपन्यांच्या कामकाजावर तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. पात्र शेतकऱ्यांची नावे विमा दाव्यांतून वगळणे, चुकीचे ‘ओव्हर इन्शुरन्स’ दाखविणे तसेच पंचनामे पूर्ण होऊनही नुकसान ग्राह्य न धरण्याच्या तक्रारी लोकप्रतिनिधींनी मांडल्या.

रावेर-मुक्ताईनगरसह इतर तालुक्यांचाही आढावा

बैठकीत रावेर आणि मुक्ताईनगर तालुक्यांबरोबरच जळगाव, चोपडा आणि यावल तालुक्यांतील केळी उत्पादकांचे नुकसान तपशीलवार मांडण्यात आले. वादळामुळे हजारो केळी खोडे जमीनदोस्त झाल्याने शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

विमा निकषांमध्ये बदलाची मागणी

सध्या केळी पीक विमा योजनेअंतर्गत मार्च ते जुलै या कालावधीत वादळामुळे झालेल्या नुकसानीलाच भरपाई दिली जाते. मात्र जिल्ह्यात जानेवारी व फेब्रुवारी महिन्यांतही वादळी पाऊस आणि वारे होत असल्याने त्या काळातील नुकसान भरपाईसाठी पात्र ठरत नाही. त्यामुळे वर्षभरात कोणत्याही काळात नैसर्गिक आपत्तीमुळे केळी पिकाचे नुकसान झाल्यास विमा संरक्षण मिळावे, असा महत्त्वपूर्ण प्रस्ताव पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी बैठकीत मांडला.

शेतकऱ्यांचे दावे तातडीने निकाली काढण्याची मागणी

शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान लक्षात घेता सर्व प्रलंबित विमा दावे तातडीने निकाली काढून नुकसानभरपाई अदा करावी, अशी मागणी आमदार चंद्रकांत पाटील यांनी केली. शेतकऱ्यांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य देत विमा कंपन्यांनी संवेदनशीलतेने काम करण्याची अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

अधिकाऱ्यांची उपस्थिती

या बैठकीला कृषी विभागाचे वरिष्ठ अधिकारी, कृषी सचिव, भारतीय कृषी विमा कंपनीचे राज्य व जिल्हास्तरीय अधिकारी तसेच शेतकरी प्रतिनिधी उपस्थित होते. शेतकऱ्यांच्या समस्या आणि विमा दाव्यांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

जिल्ह्यातील केळी उत्पादकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. कोणताही पात्र शेतकरी नुकसानभरपाईपासून वंचित राहणार नाही. शेतकऱ्यांना शंभर टक्के न्याय मिळवून देण्यासाठी शासन कटिबद्ध आहे.”

— गुलाबराव पाटील, पालकमंत्री, जळगाव जिल्हा

 

वादळामुळे हजारो केळी खोडे पडली आहेत. विमा कंपन्यांनी सर्व दावे तातडीने निकाली काढून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी.”— चंद्रकांत पाटील, आमदार :::

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button