
भागपूर उपसा सिंचन प्रकल्पाची जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्याकडून पाहणी
तीन तालुक्यांतील ३१ हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार
जळगाव, प्रतिनिधी : जळगाव, जामनेर आणि पाचोरा या तीन तालुक्यांतील शेतीसाठी वरदान ठरणाऱ्या भागपूर उपसा सिंचन प्रकल्पाला राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी भेट देऊन सुरू असलेल्या कामांची प्रत्यक्ष पाहणी केली. या महत्त्वाकांक्षी योजनेतून सुमारे ३१ हजार हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ देण्याचे उद्दिष्ट असून, प्रत्यक्ष शेतापर्यंत पाणी केव्हा पोहोचणार याकडे लाभक्षेत्रातील हजारो शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
भागपूर धरणातून पाणी उचलून अजिंठा डोंगराच्या पायथ्यापर्यंतच्या शेतीला सिंचन सुविधा उपलब्ध करून देण्याचे या योजनेत नियोजन आहे. राज्य मंत्रिमंडळाने या प्रकल्पाला सुधारित मान्यता दिली असून, ८ ऑक्टोबर २०२४ रोजीच्या सुधारित प्रशासकीय मान्यतेनुसार प्रकल्पाची अंदाजित किंमत ३ हजार ५३३ कोटी ५ लाख रुपये इतकी आहे. या प्रकल्पाची अंमलबजावणी दोन टप्प्यांत केली जात आहे.
पहिल्या टप्प्यात जळगाव तालुक्यातील २६ गावांना लाभ
प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात जळगाव तालुक्यातील चिंचोली, कंडारी, उमाळे, पाथरी, धानवड, शिरसोली प्र. बो., दापोरे, जावखेडे आणि देव्हारी यांसह एकूण २६ गावांतील शेतीला थेट सिंचन सुविधा मिळणार आहे. पिकांना ऐन गरजेच्या वेळी पाणी उपलब्ध होण्याच्या दृष्टीने पहिल्या टप्प्यातील ही कामे अत्यंत महत्त्वाची ठरणार आहेत.
दुसऱ्या टप्प्यात ४९ सिंचन प्रकल्पांमध्ये पाणीसाठा
दुसऱ्या टप्प्यात सुमारे ४४.५ किलोमीटर लांबीच्या जलवाहिनीद्वारे ९८.३५ दशलक्ष घनमीटर पाणी उचलण्याचे नियोजन आहे. हे पाणी जळगाव, जामनेर आणि पाचोरा तालुक्यांतील पाच मध्यम आणि ४४ लघु सिंचन प्रकल्पांमध्ये साठविण्यात येणार असून, त्यातून १६ हजार ८६० हेक्टर क्षेत्राला अधिक खात्रीशीर सिंचन सुविधा उपलब्ध होईल.
एकुलती आणि गोलटेकडी कामांसाठी ८० कोटींहून अधिक निधी
या योजनेअंतर्गत जामनेर तालुक्यातील एकुलती येथे साठवण तलाव, तर पाचोरा तालुक्यातील लोहारा परिसरात गोलटेकडी लघु पाटबंधारे तलाव उभारण्यात येणार आहे. या दोन्ही तलावांसह संबंधित कामांसाठी ८० कोटी रुपयांहून अधिक निधी मंजूर करण्यात आला असून, जलसंपदा विभागाने या कामांचे कार्यारंभ आदेश दिल्याची माहिती मंत्री महाजन यांनी यापूर्वीच दिली होती.
पाहणीदरम्यान मान्यवर व अधिकाऱ्यांची उपस्थिती
या पाहणी दौऱ्याप्रसंगी खासदार स्मिता वाघ, राज्याचे माजी माहिती आयुक्त व. द. पाटील, तापी पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक राजेश मोरे, जळगाव पाटबंधारे प्रकल्प मंडळाचे अधीक्षक अभियंता गोकुळ श्रावण महाजन, जळगाव उपसा सिंचन बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता प्रल्हाद पांडुरंग वराडे, जळगावच्या संकल्पचित्र उपविभागीय पथक क्रमांक ३ चे सहायक अभियंता (श्रेणी १) चंद्रशेखर सुभाष खंबायत आणि कंत्राटदाराचे प्रतिनिधी किरण अडाव उपस्थित होते.







