पाचोऱ्यातील अपहरण-खून प्रकरणाचा उलगडा; बहुळा नदीतून मृतदेह हस्तगत, दोघांना अटक

पाचोऱ्यातील अपहरण-खून प्रकरणाचा उलगडा; बहुळा नदीतून मृतदेह हस्तगत, दोघांना अटक
जळगाव / पाचोरा, प्रतिनिधी : पाचोरा तालुक्यातील गोराडखेडा येथून बेपत्ता झालेल्या व्यक्तीच्या अपहरण आणि खून प्रकरणाचा उलगडा करण्यात जळगाव स्थानिक गुन्हे शाखेला (LCB) यश आले आहे. या प्रकरणी दोघा आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून, पुरावा नष्ट करण्यासाठी बहुळा नदीत टाकलेला मृतदेह पोलिसांनी शोधमोहीम राबवून हस्तगत केला आहे. संजय धनराज तेली (वय ५०, रा. कन्नड, जि. छत्रपती संभाजीनगर) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.
१८ नोव्हेंबर २०२६ रोजी संजय तेली हे शेतीच्या व्यवहारासाठी गोराडखेडा (ता. पाचोरा) येथे आले असताना त्यांचे अज्ञात व्यक्तींनी अपहरण केल्याची तक्रार त्यांच्या मित्राने पाचोरा पोलीस ठाण्यात दिली होती. त्यानुसार भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम १४०(३) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. पुढील तपासात खुनासह पुरावा नष्ट केल्याच्या कलमांची (१०३(१), २३८, १४०(२), ३(५), ३१५) वाढ करण्यात आली.
शेतीच्या वादातून लोखंडी पाईपने मारहाण करत खून
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांना समांतर तपासाचे आदेश दिले. त्यानुसार एलसीबीच्या पथकाने गोपनीय माहिती व विश्वसनीय बातमीदाराच्या आधारे संशयित आरोपी राहुल धर्मा पाटील (वय ४५) आणि संजय वामन भिल्ल (वय ५५, दोघेही रा. गोराडखेडा, ता. पाचोरा) यांना ताब्यात घेतले.
चौकशीदरम्यान आरोपी राहुल पाटील याने शेतीच्या वादातून लोखंडी पाईपने डोक्यात जबर मारहाण करून संजय तेली यांचा खून केल्याची कबुली दिली. त्यानंतर आरोपी संजय भिल्ल याच्या मदतीने मृतदेह गोणीत भरून पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने बहुळा नदीत फेकून दिल्याचे समोर आले. आरोपींनी दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी बहुळा नदीत शोधमोहीम राबवून मृतदेह बाहेर काढला. या गुन्ह्याचा पुढील तपास पाचोरा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक प्रदीप शेवाळे करत आहेत.
या पथकाने केली कामगिरी
ही कामगिरी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते आणि उपविभागीय पोलीस अधिकारी बापू रोहम यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड व पाचोरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुल पवार यांच्या नेतृत्वाखालील पथकात पोउपनि सोपान गोरे, पोहेका लक्ष्मण पाटील, पोना राहुल पाटील, पोकॉ जितेंद्र पाटील, पोकॉ रतन गिते, पोकॉ ईश्वर पाटील, पोकॉ भूषण पाटील, चालक पोहेकॉ बाबासाहेब पाटील तसेच पाचोरा पोलीस ठाण्याचे सपोनि प्रदीप शेवाळे, पोहेकॉ दिलीप वाघमोडे यांचा समावेश होता.







