बियाणी यांच्या जमीनधारणेची जिल्हाधिकारी कार्यालयाकडून चौकशी सुरू; कागदपत्रे सादर करण्याचे निर्देश

बियाणी यांच्या जमीनधारणेची जिल्हाधिकारी कार्यालयाकडून चौकशी सुरू; कागदपत्रे सादर करण्याचे निर्देश
जळगाव / भुसावळ, प्रतिनिधी : महाराष्ट्र शेतजमीन (जमीनधारणेची कमाल मर्यादा) अधिनियम, १९६१ मधील कलम १४ व १६ अन्वये बियाणी यांच्या जमीनधारणेबाबत जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाच्या कुळकायदा शाखेकडून शासकीय चौकशी सुरू करण्यात आली आहे. या प्रकरणात कांताबाई बंसीलाल बियाणी तसेच भुसावळ तहसीलदारांना आठ दिवसांच्या आत आवश्यक कागदपत्रे व सविस्तर माहिती सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
सामाजिक तथा माहिती अधिकार कार्यकर्ते केदारनाथ वामन सानप यांनी ५ एप्रिल २०२३ आणि १ एप्रिल २०२४ रोजी अर्ज सादर करून या प्रकरणाकडे प्रशासनाचे लक्ष वेधले होते. त्या अनुषंगाने अपर जिल्हाधिकारी, जळगाव यांनी ११ ऑगस्ट २०२६ रोजी सादर केलेल्या अहवालानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी २ ऑक्टोबर २०२६ रोजी चौकशीचे आदेश पारित केले.
कागदपत्रे सादर करण्याचे आदेश या आदेशानुसार सुरू झालेल्या चौकशीत कांताबाई बंसीलाल बियाणी यांना स्वतःच्या तसेच कुटुंबातील सदस्यांच्या मालकीच्या व धारण केलेल्या जमिनींचे सविस्तर विवरण आणि आवश्यक कागदपत्रे आठ दिवसांच्या आत सादर करण्याचे निर्देश कुळकायदा शाखेचे तहसीलदार विजय सूर्यवंशी यांनी दिले आहेत.
त्याचबरोबर भुसावळच्या तहसीलदारांनाही संबंधित जमिनींचे सातबारा उतारे, महसूल नोंदी, आवश्यक कागदपत्रे आणि मूळ संचिका आठ दिवसांच्या आत सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
पारदर्शक चौकशीची मागणी या प्रकरणाची चौकशी पारदर्शक व निष्पक्ष पद्धतीने होऊन कायद्यानुसार जमीनधारणेची कसून तपासणी करावी, त्यात काही त्रुटी किंवा दोष आढळल्यास संबंधितांवर नियमानुसार कारवाई करावी तसेच शासनाच्या जमीनविषयक कायद्यांची प्रभावी अंमलबजावणी करावी, अशी मागणी केदारनाथ वामन सानप यांनी केली आहे.







