बालगंधर्व नाट्यगृहाच्या बंदिस्त कामासाठी अडीच कोटी मंजूर; ‘स्वप्न न पडणारा माणूस’ने रंगली राज्य नाट्य स्पर्धा

बालगंधर्व नाट्यगृहाच्या बंदिस्त कामासाठी अडीच कोटी मंजूर; ‘स्वप्न न पडणारा माणूस’ने रंगली राज्य नाट्य स्पर्धा
जळगाव, प्रतिनिधी : स्थानिक कलाकारांना अत्यंत माफक दरात आणि हक्काचे रंगमंच उपलब्ध व्हावे, या उद्देशाने येथील बालगंधर्व खुले नाट्यगृह बंदिस्त करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, त्यासाठी अडीच कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. येत्या सहा ते आठ महिन्यांत किंवा जास्तीत जास्त वर्षभरात हे काम पूर्ण होऊन येथे दिवस-रात्र नाट्यप्रयोग रंगतील, असा विश्वास आ. सुरेश भोळे यांनी व्यक्त केला. ६५ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेच्या जळगाव केंद्राच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
जळगावच्या कलाकारांमध्ये मोठी गुणवत्ता असली तरी मेट्रो शहरांप्रमाणे संधी आणि प्रयोगासाठी योग्य जागा मिळत नसल्याची खंत अनेकदा व्यक्त केली जाते. वाढत्या खर्चामुळे अनेक छोटे-मोठे प्रयोग रखडतात. हीच अडचण दूर करण्यासाठी प्रशासकीय स्तरावर प्रक्रिया वेगाने सुरू असून, लवकरच हे नाट्यगृह बंदिस्त स्वरूपात कलाकारांसाठी खुले होईल, असे आ. भोळे यांनी सांगितले. गर्दीपेक्षा कलेची जाण असणारे दर्दी रसिक असणे अधिक महत्त्वाचे असल्याचे सांगत त्यांनी नाट्यरसिक व स्पर्धक संघांचे कौतुक केले.
शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहण्याचे आवाहन कलाकार आणि रसिक या पलीकडे जाऊन समाजाप्रती असलेले सामाजिक भान आ. भोळे यांनी अधोरेखित केले. ते म्हणाले, “सीमेवर सैनिक लढतो म्हणून आपण शांत झोपू शकतो आणि शेतात शेतकरी राबतो म्हणून आपल्याला अन्न मिळते. यंदा कमी पावसामुळे संभाव्य दुष्काळाची स्थिती निर्माण झाली आहे. अशा कठीण प्रसंगी प्रत्येकाने तन-मन-धनाने शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहावे आणि भविष्यातील संकट टाळण्यासाठी आत्तापासूनच पाण्याची काटकसर करावी.”
राजकीय नाटकात चुकलो तर थेट ‘आऊट’! भाषणाच्या अखेरीस आ. भोळे यांनी रंगभूमी आणि राजकारण यांची मिश्किल तुलना करत सभागृहात हशा पिकवला. “मी जरी रंगभूमीवर काम करत नसलो, तरी आमचे राजकीय नाटक रोजच सुरू असते. तुमच्या नाटकात चूक झाली तर ती सुधारण्याची किंवा पुन्हा संधी मिळते; मात्र राजकारणात एकदा चूक झाली की थेट ‘आऊट’ व्हावे लागते,” अशी कोपरखळी त्यांनी मारताच उपस्थितांनी टाळ्यांची दाद दिली.
‘स्वप्न न पडणारा माणूस’चा प्रभावी प्रयोग उद्घाटनानंतर पहिल्या दिवशी भुसावळच्या ‘उत्कर्ष कलाविष्कार’ संस्थेने सादर केलेल्या ‘स्वप्न न पडणारा माणूस’ या दोन अंकी नाटकाने स्पर्धेचा पडदा उघडला. आपल्याकडे जे नाही, त्यासाठी माणूस सतत अस्वस्थ राहतो आणि या धडपडीत हाती असलेले सुखही गमावून बसतो, या मानवी मानसिकतेवर प्रकाश टाकणाऱ्या या नाटकाला रसिकांनी भरभरून प्रतिसाद दिला.
प्रशांत बागड यांच्या मूळ कथेवर आधारित आणि अनिल कोष्टी लिखित-दिग्दर्शित या नाटकात स्वतः अनिल कोष्टी यांनी मध्यवर्ती भूमिका अत्यंत संवेदनशीलतेने साकारली. त्यांच्यासह प्रबोध भावे, सुशील पाटील, उमेश गोरधे, वैष्णवी बाविस्कर, रिया कोल्हे, कुंदन तावडे, अक्षय चैत्रत, सुजय जगताप, स्वरा बेलोकर तसेच ‘ग्रीक कोरस’मधील निषिता ठाकूर, रोहित लोळके, अनिकेत सूर्यवंशी आणि रूपेश शेळके यांनी आपल्या भूमिकांनी नाटकाला रंगत आणली.
मान्यवरांची उपस्थिती व वेळापत्रक या सोहळ्यास परीक्षक उल्हास देशपांडे, सरिता अनिरुद्ध, विजय कोलवणकर, केसीई सोसायटीचे शशिकांत वडोदकर, प्रसाद देसाई, शाहीर विनोद ढगे, प्रा. शमा सराफ, अभिनेते अनिल मोरे, विशाखा सपकाळे आणि अ.भा. मराठी नाट्य परिषद नियामक मंडळ सदस्य गीतांजली ठाकरे आदी उपस्थित होते. प्रास्ताविक प्रा. संदीप तायडे यांनी केले, सूत्रसंचालन प्रा. राजेंद्र देशमुख यांनी केले, तर आभार नितीन तायडे यांनी मानले.
मू. जे. महाविद्यालयाच्या महाकवी कालिदास सभागृहात सुरू असलेल्या या स्पर्धेत दररोज सायंकाळी ७ वाजता नाट्यप्रयोग रंगणार असून, नाट्यरसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.







