Other

अनैतिक संबंधांना विरोध केल्याने पत्नीची हत्या करणाऱ्या पतीला जन्मठेप

मुलाला दोन लाखांची भरपाई देण्याचे आदेश; जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल

अनैतिक संबंधांना विरोध केल्याने पत्नीची हत्या करणाऱ्या पतीला जन्मठेप

मुलाला दोन लाखांची भरपाई देण्याचे आदेश; जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल

जळगाव (प्रतिनिधी) : पतीचे अनैतिक संबंध असल्याचे समजल्यानंतर पत्नीने विरोध केला. या कारणावरून पत्नीची हत्या केल्याप्रकरणी जळगाव जिल्हा व सत्र न्यायालयाने पती चेतन दलेरसिंग राठोड याला दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. तसेच मृत मनिषा हिचा मुलगा यश याला दोन लाख रुपयांची भरपाई निकालाच्या तारखेपासून तीन महिन्यांच्या आत देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. एन. मोरवाले यांनी हा निकाल दिला.

पाचोरा तालुक्यातील गाळण शिवारात ही घटना घडली होती. चेतन दलेरसिंग राठोड याचा विवाह मनिषा हिच्याशी ११ फेब्रुवारी २०२० रोजी झाला होता. लग्नानंतर आरोपी चेतनसह छायाबाई जयसिंग राठोड, जयसिंग राठोड आणि भगवान राठोड हे मनिषाकडे वाहनाचे हप्ते भरण्यासाठी पैशांची मागणी करीत होते. तसेच तिला शिवीगाळ व मारहाण केली जात असल्याचा आरोप होता.

दरम्यान, चेतन आणि त्याची जेठाणी छायाबाई यांच्यात अनैतिक संबंध असल्याचे मनिषाला समजले होते. तिने या संबंधांना विरोध केल्याने तिचा छळ केला जात असल्याचे तपासात समोर आले. मनिषाला वारंवार मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली जात होती. घटनेच्या सुमारे महिनाभर आधीही तिला मारहाण करून तिच्या डोक्याला दुखापत करण्यात आली होती.

४ फेब्रुवारी २०२२ रोजी सकाळी सहा वाजण्यापूर्वी गाळण शिवारातील राहत्या घरात मनिषाचा खून झाल्याचे उघडकीस आले. याप्रकरणी तिचा भाऊ ज्ञानेश्वर पवार यांनी शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतर पाचोरा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार भारतीय दंड विधानाच्या कलम ३०२, ३०४-ब, ४९८-अ, ३२३, ५०४, ५०६ आणि ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

परिस्थितीजन्य पुराव्यांच्या आधारे खटला सिद्ध

या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक गणेश चौभे यांनी केला. त्यांनी परिस्थितीजन्य पुरावे गोळा करून खटला न्यायालयात पाठविला. खटल्यादरम्यान सरकार पक्षातर्फे एकूण १२ साक्षीदारांच्या साक्षी नोंदविण्यात आल्या. फिर्यादी ज्ञानेश्वर पवार आणि शवविच्छेदन करणारे डॉक्टर वैभव सोनार यांची साक्ष महत्त्वपूर्ण ठरली.

या प्रकरणातील मृत्यूचे कारण आणि शवविच्छेदन अहवालातील निष्कर्ष खटल्याच्या दृष्टीने महत्त्वाचे होते. डॉक्टर वैभव सोनार यांनी मृतदेहावरील अंतर्गत व बाह्य जखमांच्या आधारे न्यायालयात साक्ष दिली. हा खटला संपूर्णपणे परिस्थितीजन्य पुराव्यांवर आधारित होता. घटनेच्या रात्री घरात मृत मनिषा आणि तिचा पती यांच्याशिवाय अन्य कोणी उपस्थित नसल्याचा मुद्दा सरकार पक्षाने न्यायालयासमोर मांडला.

घराच्या चार भिंतींत घडलेल्या घटनेत भारतीय पुरावा कायद्याच्या कलम १०६ मधील तरतुदींची लागू होणारी व्याप्तीही सरकार पक्षाने न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली. सरकारी वकील अॅड. भारती जे. खडसे यांनी लेखी आणि तोंडी युक्तिवाद केला. डॉक्टरांचा शवविच्छेदन अहवाल, वैद्यकीय संदर्भग्रंथ आणि सर्वोच्च तसेच उच्च न्यायालयांच्या न्यायनिर्णयांचे दाखले सादर करण्यात आले.

पतीला जन्मठेप; मुलाला दोन लाखांची भरपाई

सरकार पक्षाने सादर केलेले पुरावे आणि साक्षी विचारात घेऊन जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. एन. मोरवाले यांनी चेतन राठोड याला पत्नीच्या खुनाच्या आरोपाखाली भारतीय दंड विधानाच्या कलम ३०२ अन्वये दोषी ठरवले आणि जन्मठेपेची शिक्षा सुनावली. तसेच मृत मनिषाचा मुलगा यश याला दोन लाख रुपये भरपाई म्हणून निकालाच्या तारखेपासून तीन महिन्यांच्या आत देण्याचे आदेश दिले.

निकालावेळी न्यायालयात उपस्थित असलेल्या फिर्यादी ज्ञानेश्वर पवार यांना न्याय मिळाल्याने अश्रू अनावर झाले. या निकालामुळे न्यायव्यवस्थेवरील विश्वास अधिक दृढ झाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

या खटल्यात सरकार पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी वकील अॅड. भारती जे. खडसे यांनी कामकाज पाहिले. जिल्हा सरकारी वकील सुरेंद्र जी. काबरा यांनी मार्गदर्शन केले. पैरवी अधिकारी राजेश भावसार आणि पाचोरा पोलीस ठाण्याचे केस वॉच अधिकारी सुनील निकम यांनी सहकार्य केले.

 

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button