भुसावळमध्ये दारूच्या नशेत मित्राचा खून; रुमालाने गळा आवळून, डोके जमिनीवर आपटले
शिवीगाळ केल्याच्या रागातून मित्रानेच केला मित्राचा खून; आरोपी स्वतःहून पोलिस ठाण्यात हजर


महा पोलीस न्यूज । चेतन वाणी । भुसावळ शहरात धक्कादायक खुनाची घटना समोर आली आहे. एकत्र दारू पिणाऱ्या दोन मित्रांमध्ये वाद झाल्यानंतर आरोपीने मित्राचा रुमालाने गळा आवळून तसेच डोके जमिनीवर आपटून खून केल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे, घटना घडल्यानंतर दुसऱ्या दिवशी आरोपी स्वतःहून पोलिस ठाण्यात हजर झाला आणि “माझ्या हातून मित्राचा खून झाला” अशी कबुली दिल्याने पोलिसांनी त्याला ताब्यात घेत पुढील कारवाई सुरू केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पवन अनिल सोनावणे (वय ३०, रा. आंबेडकर नगर, वरणगाव) आणि राहुल सदाशिव धांडे (वय ३५) हे एकमेकांचे मित्र होते. दोघांनाही दारूचे व्यसन असल्याची माहिती असून ते अनेकदा एकत्र दारू प्यायचे. राहुल हा भुसावळ रेल्वे स्टेशन परिसरात साफसफाई तसेच इतर कामे करत होता. तर पवन हा काही महिन्यांपूर्वी रेल्वेतून चणे-फुटाणे विकण्याचे काम करत होता; मात्र मागील सुमारे महिनाभरापासून तो हे काम करत नसल्याची माहिती आहे.
अंधारात दारू पिल्यानंतर वाद
काल रात्री दोघेही भुसावळ रेल्वे स्टेशनच्या पलीकडे असलेल्या अंधाऱ्या परिसरात दारू पिण्यासाठी गेले होते. दारूच्या नशेत असताना राहुल याने पवनला शिवीगाळ केल्याचे सांगितले जात आहे. या शिवीगाळीचा पवनला राग आला आणि दोघांमध्ये वाद निर्माण झाला. वाद विकोपाला गेल्यानंतर पवनने राहुलचा रुमालाने गळा आवळला, तसेच त्याचे डोके जमिनीवर आपटले, अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे. या घटनेत राहुलचा मृत्यू झाला.
सकाळी आरोपी स्वतःहून पोलिस ठाण्यात
घटना घडल्यानंतर पवन हा आज सकाळी स्वतःहून वरणगाव पोलिस ठाण्यात पोहोचला. त्याने पोलिसांना आपल्या हातून मित्राचा खून झाल्याचे सांगितले. यानंतर पोलिसांनी घटनेची माहिती घेत तातडीने पुढील कायदेशीर कारवाई सुरू केली.
दरम्यान, पवन काही महिन्यांपूर्वी रेल्वेतून पडला होता. त्यानंतर तो विक्षिप्त व रागीटपणे वागत असल्याचे परिसरातील काही लोकांकडून सांगितले जात आहे. मात्र, या बाबीची अधिकृत पुष्टी पोलिस तपासातूनच होणार आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी पुढील तपास सुरू केला असून खून नेमक्या कोणत्या परिस्थितीत आणि कोणत्या कारणावरून झाला, घटनेपूर्वी दोघांमध्ये नेमका काय वाद झाला तसेच या प्रकरणातील इतर बाबींचा तपास केला जात आहे. मृतदेहाचा पंचनामा व आवश्यक वैद्यकीय प्रक्रिया करून पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे.







