Crime

‘पे अँड पार्क’मधून चालायचा चोरीच्या गाड्यांचा गोरखधंदा; आंतरराज्यीय दुचाकी चोरट्यांची टोळी जेरबंद

मुक्ताईनगर पोलिसांची धडाकेबाज कारवाई; २५.८० लाखांच्या ३० मोटारसायकली जप्त, १३ पोलीस ठाण्यांतील गुन्ह्यांची उकल

 ‘पे अँड पार्क’मधून चालायचा चोरीच्या गाड्यांचा गोरखधंदा; आंतरराज्यीय दुचाकी चोरट्यांची टोळी जेरबंद

मुक्ताईनगर पोलिसांची धडाकेबाज कारवाई; २५.८० लाखांच्या ३० मोटारसायकली जप्त, १३ पोलीस ठाण्यांतील गुन्ह्यांची उकल

मुक्ताईनगर (प्रतिनिधी) : जळगाव जिल्ह्यातील वाढत्या वाहन चोरीच्या घटनांना आळा घालत मुक्ताईनगर पोलिसांनी आंतरराज्यीय दुचाकी चोरट्यांच्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत दोन मुख्य आरोपींसह दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्याकडून तब्बल २५ लाख ८० हजार रुपये किमतीच्या ३० चोरीच्या मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत.

तांत्रिक तपासातून लागला सुगावा

मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या दुचाकी चोरीच्या गुन्ह्याचा तपास सुरू असताना पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे संशयितांची माहिती मिळवली. त्यानुसार पोलिसांनी विशाल सुरेश सोनवणे (रा. पिंपरुड, ता. यावल) आणि कुंदन सुनिल महाले (रा. सालबर्डी, ता. मुक्ताईनगर) यांच्यासह दोन अल्पवयीन संशयितांना ताब्यात घेतले.कसून चौकशीत या चौघांनी महाराष्ट्रासह अन्य राज्यांतून दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली.

पे अँड पार्क’ बनले चोरीच्या गाड्यांचे अड्डे

तपासात या टोळीची चोरी करण्याची पद्धतही समोर आली. आरोपी विविध शहरांतून दुचाकी चोरून त्या थेट रेल्वे स्थानके आणि बसस्थानकांवरील **’पे अँड पार्क’**मध्ये उभ्या करायचे. ग्राहक मिळाल्यानंतर तेथूनच गाड्यांचा सौदा करून विक्री केली जात होती. त्यामुळे पोलिसांच्या संशयापासून बचाव करण्याचा आरोपींचा प्रयत्न असल्याचे तपासात उघड झाले आहे.

महाराष्ट्र-गुजरातमधील गुन्ह्यांची उकल

या कारवाईमुळे गुजरातमधील उधना (सुरत) तसेच महाराष्ट्रातील कल्याण, नेरुळ, निफाड, वणी, इगतपुरी, गंगापूर, ओझर, सरकारवाडा, नेरळ, पारोळा, जिल्हापेठ आणि एरंडोल अशा १३ पोलीस ठाण्यांमधील दुचाकी चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.

पोलिसांच्या धडाकेबाज कारवाईचे कौतुक

ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत आणि उपविभागीय पोलीस अधिकारी केदार बारबोले यांच्या मार्गदर्शनाखाली, मुक्ताईनगरचे पोलीस निरीक्षक आशिष आडसूळ यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.

या पथकात पोलीस हेडकॉन्स्टेबल अजय खंडेराव, महेंद्र सुरवाडे, पोलीस नाईक असिम तडवी, कल्पेश आमोदकर आणि इतर कर्मचाऱ्यांनी मोलाची भूमिका बजावली.

आंतरराज्यीय वाहनचोर टोळी गजाआड झाल्याने जिल्ह्यातील वाहनधारकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.

 

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button