एलसीबीने पकडली दुचाकी चोरट्यांची टोळी, बुलेटसह ५ दुचाकी हस्तगत

महा पोलीस न्यूज । दि.२५ एप्रिल २०२५ । जळगाव शहरात तसेच जिल्ह्यातील विविध भागांतून चोरीस गेलेल्या मोटारसायकलींचा तपास लावत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तीन सराईत चोरट्यांना अटक केली आहे. या संशयित आरोपींकडून पाच मोटारसायकली हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले असून वाहनांची एकूण किंमत सुमारे २ लाख ८४ हजार रुपये इतकी आहे.
चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्याचा तपास करताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला गुप्त माहितीच्या आधारे गस्तीवर असताना त्यांना काही संशयित व्यक्तींची माहिती मिळाली. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून तीन संशयितांना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी विविध भागांतील मोटारसायकल चोरी केल्याची कबुली दिली.
तिघांना केली अटक, ५ दुचाकी हस्तगत
पोलिसांनी भगवान ऊर्फ लंगड्या सिताराम करगळ (रा.सोमनाथ, ता.माळगाव, जि.नाशिक), आकाश गोविंद गायकवाड (रा.जळगाव फाटा, निमगुळ, ता.माळगाव, जि.नाशिक), दादू संजय सोनवणे (रा.टेंभेवाडी, ता. माळगाव, जि.नाशिक) यांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली. तपासादरम्यान या तिघांनी मिळून जिल्ह्यात ५ मोटारसायकल चोरी केल्याची कबुली दिली आहे. तसेच एकावर यापूर्वी जबरी चोरी, घरफोडी, वाहन चोरी असे मिळून १३ गुन्ह्यांची नोंद आहे.
या पथकाने केली कामगिरी
संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधिक्षक कविता नेरकर, उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबी पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक अंमलदार शेखर डोमाळे, हवालदार मुरलीधर धनगर, पोलीस नाईक महेश पाटील, भुषण शेलार, सागर पाटील, मिलींद जाधव, दिपक चौधरी, भारत पाटील यांनी केली आहे.