Crime

४ लाख ८० हजारांची लाच घेताना सिक्युरिटी एजन्सीचा सुपरवायझर जाळ्यात

४ लाख ८० हजारांची लाच घेताना सिक्युरिटी एजन्सीचा सुपरवायझर जाळ्यात

जिल्हा परिषद धुळेतील सुरक्षा रक्षकांच्या नोंदणीसाठी ७ लाख ५० हजारांची मागणी; लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची पारोळ्यात कारवाई

जळगाव : जिल्हा परिषद, धुळे येथे सुरक्षा रक्षक म्हणून काम करणाऱ्या तक्रारदारासह पाच सुरक्षा रक्षकांची सुरक्षा रक्षक मंडळात नोंदणी करून देण्यासाठी तब्बल ७ लाख ५० हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई केली. तडजोडीनंतर उर्वरित ४ लाख ८० हजार रुपयांची लाच स्वीकारताना खासगी सुरक्षा एजन्सीचा सुपरवायझर बारकु कालू पाटील याला पंचांसमक्ष ताब्यात घेण्यात आले. त्याच्यासह जिल्हा परिषद, धुळे येथील फिटर पुरुषोत्तम मंगाजी वाघ यालाही ताब्यात घेण्यात आले आहे.

पाच सुरक्षा रक्षकांकडून मागितली होती रक्कम

एसीबीच्या माहितीनुसार, तक्रारदार हा गेल्या १४ महिन्यांपासून जिल्हा परिषद, धुळे येथे तात्पुरत्या स्वरूपात सुरक्षा रक्षक म्हणून काम करीत आहे. सुरक्षा रक्षक मंडळात नोंदणी करण्याच्या कामासाठी तक्रारदारासह अन्य चार सुरक्षा रक्षकांकडून प्रत्येकी १ लाख ५० हजार रुपये, अशी एकूण ७ लाख ५० हजार रुपयांची लाच मागण्यात आली होती.

यापैकी तक्रारदाराने यापूर्वी १ लाख रुपये दिले होते. मात्र, त्यानंतरही काम न झाल्याने तक्रारदाराने संबंधितांकडे कामाबाबत विचारणा केली.

उर्वरित ६ लाख ५० हजारांची मागणी

८ ऑगस्ट रोजी तक्रारदाराने पुरुषोत्तम वाघ यांची भेट घेऊन कामाबाबत विचारणा केली असता, वाघ यांनी यापूर्वी घेतलेल्या रकमेव्यतिरिक्त उर्वरित ६ लाख ५० हजार रुपये देण्याची मागणी केल्याचा आरोप आहे. याबाबत तक्रारदाराने ११ ऑगस्ट रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जळगाव येथे तक्रार दिली.

तक्रारीची ११ व १२ ऑगस्ट रोजी पंचांसमक्ष पडताळणी करण्यात आली. त्यावेळी तडजोडीनंतर ५ लाख ८० हजार रुपयांची लाच देण्याचे ठरले. यापूर्वी १ लाख रुपये स्वीकारले असल्याने उर्वरित ४ लाख ८० हजार रुपये बारकु पाटील याच्याकडे देण्यास सांगण्यात आल्याचे एसीबीने सांगितले.

हॉटेलमध्ये स्वीकारली ४.८० लाखांची लाच

बुधवारी, १२ ऑगस्ट रोजी पारोळा शहरातील हॉटेल ग्रीन पार्क येथे एसीबीने सापळा रचला. पंचांसमक्ष खासगी इसम बारकु कालू पाटील याने ४ लाख ८० हजार रुपयांची लाचेची रक्कम स्वीकारताच एसीबीच्या पथकाने त्याला ताब्यात घेतले. या कारवाईत पुरुषोत्तम वाघ यालाही ताब्यात घेण्यात आले.

गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू

या प्रकरणी भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमाच्या कलम ७, ७(अ) व १२ अन्वये पारोळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपींच्या अटकेची पुढील कारवाई करण्यात येणार आहे.

एसीबीच्या पथकाची कारवाई

ही कारवाई पोलीस निरीक्षक रेश्मा अवतारे, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नंदुरबार, कॅम्प जळगाव यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. पर्यवेक्षण पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जळगाव यांनी केले.

पथकात पोलीस निरीक्षक हेमंत नागरे, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक सुरेश पाटील, पोलीस हवालदार सुनील वानखेडे, किशोर महाजन, बाळू मराठे तसेच पोलीस कर्मचारी राकेश दुसाने, सचिन चाटे, प्रणेश ठाकूर आणि मनोज पाटील यांचा समावेश होता.

या कारवाईसाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक भारत तांगडे, अपर पोलीस अधीक्षक प्रदीप मैराळे आणि अपर पोलीस अधीक्षक कविता फडतरे यांचे मार्गदर्शन लाभले.

लाच मागितल्यास एसीबीशी संपर्काचे आवाहन

भ्रष्टाचारासंबंधी माहिती अथवा लाच मागणाऱ्या लोकसेवकाविरुद्ध तक्रार असल्यास नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन विभागाने केले आहे. जळगाव एसीबी कार्यालयाचा दूरध्वनी ०२५७-२२३५४७७, व्हॉट्सअॅप ७५८८६६१०६४ आणि टोल फ्री क्रमांक १०६४ असा आहे.

 

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button