महाराष्ट्र पोलीस दलात मोठे फेरबदल : वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश
नाशिक परीक्षेत्र पोलीस महानिरीक्षकपदी प्रवीण पडवळ : चाळीसगाव अपर पोलीस अधीक्षकपदी अशोक नखाते

महा पोलीस न्यूज । चेतन वाणी । महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाने आज राज्य पोलीस दलातील भारतीय पोलीस सेवा (IPS) आणि राज्य पोलीस सेवेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आणि नवीन पदस्थापनेचे आदेश जारी केले आहेत. पोलीस आस्थापना मंडळ क्र. १ च्या शिफारशींनुसार आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ च्या कलम २२न मधील तरतुदींनुसार हे फेरबदल करण्यात आले आहेत. शासनाचे सह सचिव सुग्रिव धपाटे यांच्या स्वाक्षरीने हे आदेश निर्गमित करण्यात आले आहेत. प्रवीण मुंढे आणि मोक्षदा पाटील यांची पदोन्नतीने अपर पोलीस आयुक्त बृहन्मुंबई, नंदकुमार ठाकूर यांची उपसंचालक एमपीए, नाशिक, नाशिक परिक्षेत्र विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांची बदली झाली असून त्यांच्या जागी प्रवीण पडवळ यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
या महत्त्वाच्या बदल्यांमध्ये मुंबई, नवी मुंबई, पुणे आणि पिंपरी-चिंचवड यांसारख्या मोठ्या शहरांमधील पोलीस उप आयुक्त स्तरावरील अधिकाऱ्यांचा समावेश आहे. विशेष पोलीस सहायक महानिरीक्षक विजय खरात यांची बदली नवी मुंबईच्या पोलीस उप आयुक्तपदी करण्यात आली आहे. विशाल गायकवाड यांची अपर पोलीस अधीक्षक (लोहमार्ग, पुणे शहर) तर गणेश शिंदे यांची बदली पोलीस उप आयुक्त (बृहन्मुंबई) म्हणून करण्यात आली आहे. फोर्स वनचे पोलीस अधीक्षक दिनेश बारी यांची बदली आता पोलीस अधीक्षक (दहशतवाद विरोधी पथक, मुंबई) या महत्त्वाच्या पदावर करण्यात आली आहे. गुन्हे दोष सिद्धी प्रशिक्षण विद्यालय नाशिकचे प्राचार्य चंद्रकांत गवळी यांची पोलीस उपायुक्त नाशिक शहर, चाळीसगाव अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर यांची पोलीस उपायुक्त बृहन्मुंबई, तर अशोक नखाते यांची चाळीसगाव अपर पोलीस अधीक्षक पदी बदली करण्यात आली आहे.
राज्य गुप्तवार्ता विभागातही (SID) मोठे फेरबदल झाले असून उज्ज्वला वानकर, रमेश नागनाथ चोपडे आणि वैशाली शिंदे यांची या विभागात बदली करण्यात आली आहे. पंकज डहाणे आणि तिरुपती काकडे यांची नवी मुंबईतून बदली करण्यात आली असून, काकडे यांची नियुक्ती महामार्ग सुरक्षा (रायगड) येथे करण्यात आली आहे. पुण्याचे पोलीस उप आयुक्त संभाजी कदम आणि अकबर पठाण यांचीही बदली करण्यात आली असून पठाण यांची नियुक्ती नाशिकच्या महाराष्ट्र पोलीस अकादमीमध्ये करण्यात आली आहे. यवतमाळ पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांची पोलीस उपायुक्त नागपूर शहर, लोहित मतानी यांची पोलीस अधीक्षक महामार्ग सुरक्षा नागपूर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
या आदेशात काही अधिकाऱ्यांना मुदतवाढही देण्यात आली आहे, ज्यामध्ये ठाण्याचे पोलीस उप आयुक्त सचिन पांडुरंग गोरे आणि नागपूरचे पोलीस उप आयुक्त राहुल मदने यांना त्यांच्या सध्याच्या पदावर एक वर्षाची मुदतवाढ मिळाली आहे.
बदल्या झालेल्या इतर प्रमुख अधिकाऱ्यांमध्ये संदीप जाधव (पोलीस अधीक्षक, गुन्हे अन्वेषण, नाशिक), यशवंत सोळंखे (अपर पोलीस अधीक्षक, अंमलीपदार्थ विरोधी पथक, नागपूर), सुहास बावचे (सहायक पोलीस महानिरीक्षक, दक्षता) आणि प्रिती टिपरे (पोलीस उप आयुक्त, मिरा-भाईंदर-वसई-विरार) यांचा समावेश आहे.






