Other

तहसीलदारांच्या निलंबनाच्या मागणीसाठी २९ जूनला चोपड्यात विराट जनआंदोलन

अवैध वाळू उत्खननाकडे दुर्लक्षाचा आरोप; जिल्हाधिकाऱ्यांना सर्वपक्षीय शिष्टमंडळाचे निवेदन

तहसीलदारांच्या निलंबनाच्या मागणीसाठी २९ जूनला चोपड्यात विराट जनआंदोलन

अवैध वाळू उत्खननाकडे दुर्लक्षाचा आरोप; जिल्हाधिकाऱ्यांना सर्वपक्षीय शिष्टमंडळाचे निवेदन

चोपडा | प्रतिनिधी

चोपडा तालुक्यातील नदीपात्रांमधून सुरू असलेल्या कथित अवैध वाळू उत्खननाकडे वारंवार तक्रारी करूनही दुर्लक्ष केल्याचा आरोप करत चोपडा तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांच्या निलंबनाची मागणी सर्वपक्षीय पदाधिकारी आणि भारतीय पत्रकार महासंघाच्या वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भात जळगाव जिल्हाधिकारी रोहन घुगे यांना निवेदन देण्यात आले असून, तहसीलदारांच्या कार्यपद्धतीची सखोल चौकशी करून त्यांच्या संपत्तीची ईडी, आयकर विभाग आणि आर्थिक गुन्हे शाखेमार्फत चौकशी करण्याची मागणीही करण्यात आली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांच्या कार्यकाळात वाळू व गौण खनिज प्रकरणांमध्ये संशयास्पद दुर्लक्ष, विविध गंभीर अनियमितता, कर्तव्यातील हलगर्जीपणा, नागरिकांशी गैरवर्तन, शासकीय कामकाजातील दिरंगाई तसेच पत्रकारांना अपमानास्पद वागणूक दिल्याच्या अनेक तक्रारी विविध प्रशासकीय कार्यालयांकडे प्राप्त झाल्या आहेत. उपलब्ध तक्रारी, वृत्तपत्रांमधील बातम्या, शासकीय नोटिसा आणि अन्य कागदपत्रांच्या आधारे या प्रकरणांची निष्पक्ष व सखोल चौकशी होणे आवश्यक असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

यापूर्वी ३ जून रोजीही पत्रकारांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी निवेदन सादर केले होते. ते निवासी उपजिल्हाधिकारी वैशाली चव्हाण यांनी स्वीकारले होते. मात्र, अद्याप तहसीलदार, चहार्डी मंडळ अधिकारी आणि निमगव्हाण-तांदलवाडी येथील तलाठी यांच्याविरोधात कोणतीही ठोस कारवाई झालेली नसल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.

या पार्श्वभूमीवर चोपडा तालुक्यातील सर्वपक्षीय पदाधिकारी आणि भारतीय पत्रकार महासंघाच्या वतीने २९ जून रोजी दुपारी १२ वाजता चोपडा तहसील कार्यालयासमोर विराट जनआंदोलन करण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे.

या निवेदनावर माजी आमदार कैलास पाटील, भाजपचे शहराध्यक्ष तथा नगरसेवक नरेंद्र पाटील, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संजय सोनवणे, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) चे तालुकाध्यक्ष बाळासाहेब पाटील, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) चे तालुकाप्रमुख देवेंद्र सोनवणे, मनसेचे अनिल वानखेडे, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) चे तालुकाध्यक्ष डॉ. चंद्रकांत बारेला, माजी सभापती नारायण पाटील, महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा सोनाली पाटील, शशिकांत देवरे, शशिकांत पाटील, भारतीय पत्रकार महासंघाचे विभागीय अध्यक्ष विलास पाटील, जिल्हाध्यक्ष नंदलाल मराठे यांच्यासह विविध मान्यवरांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

निवेदन सादर करताना डॉ. चंद्रकांत बारेला, शशिकांत देवरे, नंदलाल मराठे, विलास पाटील, अमोल राजपूत आदी उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी तहसीलदारांच्या निलंबनाचा निर्णय त्यांच्या अधिकारक्षेत्रात नसल्याचे स्पष्ट करत, या प्रकरणाचा सविस्तर अहवाल वरिष्ठांकडे पाठविण्यात येईल, असे आश्वासन शिष्टमंडळाला दिले.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button