रिदम इरिगेशन ठिबक कंपनीचे संस्थापक कैलास निळे यांचा ‘मराठी उद्योजक पुरस्कार

रिदम इरिगेशन ठिबक कंपनीचे संस्थापक कैलास निळे यांचा ‘मराठी उद्योजक पुरस्कार
भुसावळ | प्रतिनिधी
भुसावळ येथील रिदम इरिगेशन ठिबक कंपनीचे संस्थापक उद्योजक कैलास निळे यांना उद्योग क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य, कृषी क्षेत्रासाठी केलेले नाविन्यपूर्ण योगदान आणि ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती केल्याबद्दल ‘मराठी उद्योजक पुरस्कार’ प्रदान करून गौरविण्यात आले. Saturday क्लब भुसावळ चॅप्टर, जळगाव रिजन यांच्या वतीने आयोजित सोहळ्यात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
यावल तालुक्यातील चुंचाळे या ग्रामीण भागातून सुरू झालेला निळे कुटुंबाचा व्यवसाय आज रिदम इरिगेशन या नावाने राज्यासह देशभर पोहोचला आहे. आधुनिक तंत्रज्ञान, गुणवत्तापूर्ण उत्पादन आणि शेतकरीहिताची भूमिका यामुळे कंपनीने अल्पावधीतच कृषी क्षेत्रात विश्वासार्ह स्थान निर्माण केले आहे.
भुसावळ येथे उभारण्यात आलेल्या रिदम इरिगेशनच्या अत्याधुनिक उत्पादन प्रकल्पात ठिबक सिंचनासाठी लागणाऱ्या विविध साहित्याची निर्मिती केली जाते. येथे तयार होणाऱ्या उत्पादनांचा पुरवठा महाराष्ट्रासह देशातील विविध राज्यांमध्ये केला जात असून, भुसावळच्या औद्योगिक विकासात कंपनीचे मोलाचे योगदान आहे.
रिदम इरिगेशनने शेतकऱ्यांना दर्जेदार, किफायतशीर आणि आधुनिक सिंचन साहित्य उपलब्ध करून देत पाणी बचत आणि उत्पादनवाढीस चालना दिली आहे. संशोधन, गुणवत्ता आणि ग्राहकांचा विश्वास या त्रिसूत्रीच्या बळावर कंपनीने कृषी क्षेत्रात स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे.
कंपनीमुळे १२५ हून अधिक युवकांना थेट रोजगार उपलब्ध झाला असून, ग्रामीण भागातील अनेक कुटुंबांना आर्थिक स्थैर्य मिळाले आहे. रोजगारनिर्मितीबरोबरच औद्योगिक आणि सामाजिक विकासातही रिदम इरिगेशनचे योगदान उल्लेखनीय मानले जात आहे.
पुरस्कार स्वीकारल्यानंतर कैलास निळे यांनी हा सन्मान आपल्या कुटुंबीय, सहकारी कर्मचारी आणि ग्राहकांना समर्पित करत, “शेतकऱ्यांना अधिक दर्जेदार, आधुनिक आणि परवडणारे सिंचन साहित्य उपलब्ध करून देणे हेच आमचे ध्येय आहे. गुणवत्ता आणि विश्वासाच्या जोरावर रिदम इरिगेशनला देशातील अग्रगण्य ठिबक कंपन्यांमध्ये स्थान मिळवून देण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील राहू,” असे सांगितले.
या कार्यक्रमाला पुणे येथील उद्योजक महेश्वर मराठे, डॉ. अजित मराठे, अभिजीत पाटील, धीरज महाजन, गौतम चौधरी, निलेश शेटे, श्रीराम पाटील यांच्यासह जळगाव जिल्ह्यातील अनेक उद्योजक उपस्थित होते.
ग्रामीण भागातून सुरू झालेल्या उद्योगाने राष्ट्रीय स्तरावर यश मिळवत शेतकरी, रोजगार आणि औद्योगिक विकास यांचा संगम साधल्याबद्दल कैलास निळे आणि रिदम इरिगेशनचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे.






