OtherCrime

फेक अकाऊंट ‘शांताबाई’चे कारनामे उघड!

फेक अकाऊंट ‘शांताबाई’चे कारनामे उघड!

तथाकथित शांताराम रणजित दराडे जेरबंद; पाच दिवसांची पोलीस कोठडी

चाळीसगाव | प्रतिनिधी
‘शांताबाई’ नावाने सोशल मीडियावर धुमाकूळ घालणाऱ्या फेक अकाऊंटचा पर्दाफाश झाला असून, या प्रकरणातील मुख्य आरोपी रणजित दराडे याला चाळीसगाव पोलिसांनी अटक केली आहे. न्यायालयाने त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून, शहरात एकच खळबळ उडाली आहे.

गेल्या वर्षभरात ‘शांताबाई’ नावाने सुरू असलेल्या फेसबुक पेजवरून सुरुवातीला सामाजिक प्रश्नांवर पोस्ट केल्या जात होत्या. त्यामुळे शहरवासीयांमध्ये ‘शांताबाई’बाबत आत्मीयता निर्माण झाली होती. मात्र नंतर या अकाऊंटचा वापर विशिष्ट नेत्यांची, शिक्षकांची आणि सामाजिक कार्यकर्त्यांची बदनामी करण्यासाठी सुरू झाला. या पोस्ट खालच्या पातळीवर जात असल्याने अनेकांनी नाराजी व्यक्त केली होती.

या प्रकाराला वाचा फोडताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते कैलास सूर्यवंशी यांनी नाशिक सायबर क्राईमकडे तक्रार दाखल केली. चौकशीतून रणजित दराडे याचे नाव पुढे आले. त्यानेच ‘शांताबाई’ हे बनावट फेसबुक अकाऊंट तयार करून त्याद्वारे बदनामी आणि खंडणीचे सत्र सुरू ठेवले होते. पीडितांकडून बदनामी न करण्याच्या अटीवर पैसे उकळले जात होते.

हिंगोणे येथील माध्यमिक शिक्षक अजिज शेख यांच्यासह अनेक प्रतिष्ठित व्यक्तींनी ‘शांताबाई’च्या धमक्यांचा सामना केला. अजिज शेख यांच्याकडून रणजित दराडे आणि त्याचे साथीदार — मुराद पटेल व इम्रान शेख — यांनी रोख २० हजार रुपये आणि फोनपेने १० हजार रुपये उकळल्याचा आरोप आहे. या प्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात खंडणी आणि बदनामीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फेसबुकवरील फेक प्रसिद्धीमुळे चर्चेत आलेला तथाकथित ‘शांताराम’ अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकला असून, आणखी कोण कोण या जाळ्यात अडकते, याकडे संपूर्ण चाळीसगावचे लक्ष लागून आहे.

या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संदीप घुले आणि त्यांचे सहकारी करत आहेत. पुढील काही दिवसांत या प्रकरणात आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १५ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १२ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. मोबाईल नंबर : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button