CrimeSocial

सातपुड्यातील मनुदेवी मंदिरात चोरी; चांदीच्या वस्तू लंपास

मंदिराचे चैनल गेट व लाकडी दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्यांचा प्रवेश; १ लाख ३५ हजारांचा ऐवज चोरी

सातपुड्यातील मनुदेवी मंदिरात चोरी; चांदीच्या वस्तू लंपास

मंदिराचे चैनल गेट व लाकडी दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्यांचा प्रवेश; १ लाख ३५ हजारांचा ऐवज चोरी

यावल | प्रतिनिधी

सातपुडा डोंगररांगांतील यावल तालुक्यातील मनुदेवी माता मंदिरात अज्ञात चोरट्याने घरफोडी करून सुमारे १ लाख ३५ हजार रुपये किमतीच्या चांदीच्या वस्तू लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी यावल पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध घरफोडी व चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चैनल गेटचे कुलूप तोडून मंदिरात प्रवेश

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. ६ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५.३० वाजेपासून ते ७ ऑगस्ट रोजी सकाळी ७ वाजेपर्यंतच्या कालावधीत अज्ञात चोरट्याने सातपुडा डोंगरातील मनुदेवी माता मंदिराला लक्ष्य केले. चोरट्याने मंदिराच्या मुख्य चैनल गेटचे तसेच मंदिराच्या गाभाऱ्याच्या लाकडी दरवाजाचे कडी-कोंडे तोडून आत प्रवेश केला.

चांदीचे मुकुट व छत्र लंपास

मंदिरात प्रवेश केल्यानंतर चोरट्याने मनुदेवी माता व रेणुका माता यांच्या मूर्तीवरील चांदीच्या वस्तू चोरी करून नेल्या. यामध्ये अंदाजे ३०० ग्रॅम वजनाचा चांदीचा मनुदेवी माता मूर्तीवरील मुकुट, अंदाजे २०० ग्रॅम वजनाचे चांदीचे छत्र तसेच अंदाजे ३०० ग्रॅम वजनाचा चांदीचा रेणुका माता मूर्तीवरील मुकुट यांचा समावेश आहे.

चोरीला गेलेल्या या चांदीच्या वस्तूंची एकूण अंदाजे किंमत १ लाख ३५ हजार रुपये असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

शेतकऱ्याच्या फिर्यादीवरून गुन्हा

याप्रकरणी शिवाजी प्रभाकर पाटील (वय ५१, व्यवसाय शेती, रा. आडगाव, ता. यावल, जि. जळगाव) यांनी यावल पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीवरून गुन्हा रजिस्टर क्रमांक २९०/२०२६ नुसार भारतीय न्याय संहितेतील कलम ३३१(३), ३३१(४) व ३०५(अ) अन्वये घरफोडी व चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पाहणी करून तपास सुरू केला आहे. अज्ञात चोरट्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून विविध दिशेने तपास सुरू असून, मंदिर परिसरातील हालचाली आणि उपलब्ध पुराव्यांच्या आधारे आरोपीचा शोध घेतला जात आहे.

या गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस निरीक्षक रंगनाथ धारबळे करीत आहेत.

 

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button