माजी आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांच्या कार्यकाळाची चौकशी करा

माजी आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांच्या कार्यकाळाची चौकशी करा
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) ची महापौरांकडे मागणी; सर्व निर्णयांचे विशेष ऑडिट करून दोषींवर कारवाईची मागणी
जळगाव | प्रतिनिधी
जळगाव महानगरपालिकेचे माजी आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांच्या प्रशासकीय कार्यकाळातील सर्व निर्णय, ठराव आणि आर्थिक व्यवहारांची सखोल चौकशी करून विशेष लेखापरीक्षण (ऑडिट) करण्यात यावे. तसेच अनियमितता आढळल्यास संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार गट) यांनी महापौरांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
माजी महानगराध्यक्ष तथा माजी नगरसेवक अशोक सिताराम लाडवंजारी यांच्या नेतृत्वाखाली सुनिल माळी, राजू मोरे, किरण राजपूत, रिंकू चौधरी, रहिम तडवी, सुहास चौधरी आणि नईम खाटीक यांनी हे निवेदन सादर केले.
निवेदनात ख्वाजामिया झोपडपट्टी प्रकरण, बीओएलटी कंत्राट, बहारू भूसंपादन प्रकरण, अटलंटा प्रकरण, पथदिवे दुरुस्ती, आरोग्य व स्वच्छता मक्ते तसेच विविध विकासकामांमध्ये अनियमितता झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) ने माजी आयुक्तांच्या कार्यकाळातील सर्व निर्णयांची चौकशी करून विशेष ऑडिट करण्यात यावे आणि दोषी आढळणाऱ्या सर्व संबंधितांवर गुन्हे दाखल करावेत, अशी ठाम मागणी केली आहे.






