नीट पेपरफुटी, इंधन दरवाढ व डिझेल टंचाईविरोधात युवक काँग्रेसचे आंदोलन

नीट पेपरफुटी, इंधन दरवाढ व डिझेल टंचाईविरोधात युवक काँग्रेसचे आंदोलन
जळगाव : नीट परीक्षेतील कथित घोटाळा, वाढती महागाई, डिझेल-पेट्रोल दरवाढ आणि शेतकऱ्यांना भेडसावणारी डिझेल टंचाई या विविध प्रश्नांवर जळगाव जिल्हा युवक काँग्रेसतर्फे शनिवारी (दि. २४ मे) शास्त्री टॉवर चौकात आंदोलन करण्यात आले. भाजप सरकारच्या धोरणांविरोधात घोषणाबाजी करत युवक काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी संताप व्यक्त केला.
आंदोलनादरम्यान नीट परीक्षेतील गैरव्यवहारामुळे विद्यार्थी आणि पालकांना मोठा मानसिक त्रास सहन करावा लागत असल्याचा आरोप करण्यात आला. महाराष्ट्र सरकारने याची जबाबदारी स्वीकारून पुनर्परीक्षेसाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना व त्यांच्या पालकांना एस.टी. महामंडळामध्ये मोफत प्रवासाची सुविधा द्यावी, तसेच बसभाडे माफ करावे, अशी मागणी करण्यात आली. “विद्यार्थी वर्षानुवर्षे मेहनत घेऊन भविष्य घडविण्याचा प्रयत्न करतात, मात्र काही मंडळी पेपरफुटी करून त्यांच्या आयुष्याशी खेळ करत आहेत. दोषींवर कठोर कारवाई झाली पाहिजे,” अशी भूमिका जळगाव काँग्रेस महानगर जिल्हाध्यक्ष जमील शेख यांनी मांडली.
यावेळी डिझेल-पेट्रोल दरवाढीचाही निषेध करण्यात आला. सुरुवातीला केवळ दोन ते तीन रुपयांची दरवाढ जाहीर करून त्यानंतर दररोज इंधनाच्या किमती वाढवल्या जात असल्याचा आरोप पदाधिकाऱ्यांनी केला. तसेच इंधन पुरवठ्यातील अनियमिततेमुळे नागरिक आणि शेतकरी त्रस्त असल्याचे सांगत शासनाने तातडीने नियोजन करावे, अशी मागणी करण्यात आली.
शेतकऱ्यांना पेरणीच्या काळात डिझेल आणि खतांची टंचाई भासत असून यामुळे शेतीकामांवर परिणाम होत असल्याची चिंता व्यक्त करण्यात आली. शेतकऱ्यांना सुरळीत डिझेल उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी आंदोलनातून करण्यात आली.
दरम्यान, युवक काँग्रेसची मासिक आढावा बैठकही उत्साहात पार पडली. बैठकीला महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे महासचिव तथा जळगाव जिल्हा प्रभारी अभिलाष तायडे प्रमुख उपस्थित होते. त्यांनी युवक पदाधिकाऱ्यांना संघटन मजबूत करण्यासाठी लोकांमध्ये जाऊन त्यांच्या समस्या सोडविण्याचे आवाहन केले. प्रदेश सचिव किरण पाटील, प्रदेश सचिव आशुतोष पवार आणि प्रदेश सचिव तुषार संदानशिव यांनीही युवकांना मार्गदर्शन केले.
बैठकीत नीट परीक्षा घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर आत्महत्या केलेल्या चार विद्यार्थ्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. तसेच वाढती महागाई, इंधन टंचाई आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर युवक काँग्रेस पुढील काळात तीव्र आंदोलन उभारेल, असा ठराव करण्यात आला.
या आंदोलन व बैठकीला जळगाव काँग्रेस महानगर जिल्हाध्यक्ष जमील शेख, युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष महेश पाटील, जळगाव शहर युवक जिल्हाध्यक्ष मुजीब पटेल, युवक काँग्रेस सचिव सलमान तडवी, गौरव देशमुख, भुसावळ विधानसभा युवक अध्यक्ष नगरसेवक रोहन सूर्यवंशी, पाचोरा विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्ष मनोहर महाले, चाळीसगाव विधानसभा युवक अध्यक्ष प्रज्वल राजपूत, एरंडोल तालुकाध्यक्ष चेतन पाटील, यावल तालुकाध्यक्ष अनिल कोळी, अमळनेर तालुका ग्रामीण युवक काँग्रेस अध्यक्ष विकास पाटील, धरणगावचे योगेश येवले, माजी शहराध्यक्ष गौरव चव्हाण, भडगाव शहराध्यक्ष गोविंद देशमुख, चोपडा शहराध्यक्ष माजित तडवी आदी पदाधिकारी उपस्थित होते.






