
ईद-ए-मिलादच्या पार्श्वभूमीवर अडावद पोलिसांची शांतता समिती बैठक
मिरवणुकीदरम्यान कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्याचे आवाहन; १५० नागरिकांची उपस्थिती
जळगाव : ईद-ए-मिलाद २०२६ सणाच्या पार्श्वभूमीवर अडावद पोलीस ठाण्याच्या हद्दीत शांतता व सुव्यवस्था कायम राहावी, यासाठी पोलिसांच्या वतीने मोहल्ला कमिटी सदस्य, मुस्लिम पंच कमिटी, मौलाना, प्रतिष्ठित नागरिक तसेच तरुणांची बैठक घेण्यात आली.
पाच गावांतील नागरिकांचा सहभाग
शनिवार, दि. ८ ऑगस्ट रोजी सकाळी ११ ते ११.५० वाजेदरम्यान अडावद, कुंड्यापाणी, धानोरा प्र.अ., बिडगाव व मोहरद या गावांतील नागरिकांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडली. बैठकीला सुमारे १३० ते १५० कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.
कायदा-सुव्यवस्थेबाबत मार्गदर्शन
ईद-ए-मिलाद सणाच्या अनुषंगाने वरिष्ठांकडून प्राप्त सूचनांची माहिती उपस्थितांना देण्यात आली. मिरवणुकीदरम्यान कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही, यासाठी पोलिसांकडून आवश्यक सूचना देण्यात आल्या.
यावेळी उपस्थित नागरिकांच्या अडीअडचणीही जाणून घेण्यात आल्या. सण शांततेत व उत्साहात साजरा करण्यासाठी नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले.
बैठक शांततेत पार पडली.







