Social

आगामी मान्सून काळात आपत्ती व्यवस्थापनासाठी सर्व यंत्रणांनी सज्ज राहावे – जिल्हाधिकारी रोहन घुगे

आगामी मान्सून काळात आपत्ती व्यवस्थापनासाठी सर्व यंत्रणांनी सज्ज राहावे – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जळगाव,  प्रतिनिधी:
जून महिन्यात सुरु होणाऱ्या मान्सून काळाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जळगाव तसेच जिल्ह्यातील सर्व विभाग प्रमुखांची आगामी मान्सूनपूर्व व मान्सून काळात विविध पातळीवर करावयाची पूर्वतयारी आणि विभागनिहाय उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण जळगाव रोहन घुगे यांच्या अध्यक्षतेखाली आज दूरदृश्य प्रणालीद्वारे मान्सूनपूर्व आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली.
यावेळी प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी अर्चना मोरे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी नरवीर रावळ, विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

बैठकीत जिल्ह्यात संभाव्य अतिवृष्टी, पूरस्थिती, वीजपुरवठा खंडित होणे, रस्ते वाहतूक अडथळे, पाणी साचणे तसेच आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने विविध विभागांनी करावयाच्या उपाययोजनांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व विभागांनी परस्पर समन्वय राखून आपत्ती व्यवस्थापनाची यंत्रणा सक्षम ठेवण्याच्या सूचना दिल्या.

गाव व शहर पातळीवर पाणी साचणाऱ्या ठिकाणांची ओळख करून आवश्यक उपाययोजना करण्यासह नियंत्रण कक्ष २४x७ कार्यरत ठेवण्याबाबत निर्देश देण्यात आले. सार्वजनिक बांधकाम विभाग, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण तसेच संबंधित यंत्रणांनी रस्ते, पूल व नाल्यांची तातडीने पाहणी करून दुरुस्तीची कामे पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले. महावितरण विभागाने वीजवाहिन्यांलगत धोकादायक झाडांच्या फांद्यांची छाटणी करून अखंडित वीजपुरवठ्यासाठी आवश्यक तयारी ठेवावी, अशा सूचना यावेळी देण्यात आल्या.

तसेच आरोग्य विभागाने साथीच्या रोगांच्या प्रतिबंधासाठी औषधसाठा, आरोग्य पथके व रुग्णवाहिका सज्ज ठेवाव्यात, तर महसूल, पोलीस, परिवहन, कृषी, दूरसंचार व इतर विभागांनी आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ प्रतिसादासाठी आवश्यक मनुष्यबळ व यंत्रणा उपलब्ध ठेवण्यावर भर देण्यात आला. नदी, नाले व धरण परिसरातील नागरिकांना वेळोवेळी सतर्कतेच्या सूचना देण्याबाबतही संबंधित विभागांना निर्देशित करण्यात आले.

जिल्हाधिकाऱ्यांनी आपत्ती व्यवस्थापनात समन्वय, तत्परता आणि नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देण्याचे आवाहन केले. बैठकीस विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी दूरदृश्य प्रणाली द्वारे उपस्थित होते.
***********

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button