Other

अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना मोठा दिलासा; जळगाव जिल्ह्यासाठी १४.५० कोटींची मदत मंजूर

अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना मोठा दिलासा; जळगाव जिल्ह्यासाठी १४.५० कोटींची मदत मंजूर

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश; १४ हजारांहून अधिक शेतकऱ्यांना लाभ

जळगाव (प्रतिनिधी) : एप्रिल २०२६ मध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना राज्य शासनाने मोठा दिलासा दिला आहे. जळगाव जिल्ह्यासाठी १४ कोटी ५० लाख ८९ हजार रुपयांची मदत मंजूर करण्यात आली असून, यासंदर्भातील शासन निर्णय २५ जून २०२६ रोजी जारी करण्यात आला आहे. या निर्णयामुळे जिल्ह्यातील १४ हजार ३६० बाधित शेतकरी तसेच ७ हजार ९३४ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान भरून काढण्यास मदत होणार आहे.

या मदतीसाठी राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्यासोबत जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, आमदार चंद्रकांत पाटील, प्रा. चंद्रकांत सोनवणे, अमोल जावळे, मंगेश चव्हाण तसेच इतर लोकप्रतिनिधींनीही शासनाकडे पाठपुरावा केला.

अवकाळी पावसानंतर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी जिल्हा प्रशासनाला तातडीने पंचनामे पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालय, महसूल विभाग आणि कृषी विभागाने नुकसानाचा सविस्तर अहवाल शासनाकडे सादर केला. या अहवालाच्या आधारे राज्य शासनाने राज्यातील विविध जिल्ह्यांसाठी १०६ कोटी ५६ लाख ४८ हजार रुपयांची मदत मंजूर केली असून त्यातील १४.५० कोटी रुपयांचा वाटा जळगाव जिल्ह्याला मिळाला आहे.

पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले…

“एप्रिल आणि मे महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. त्यांना तातडीने आर्थिक मदत मिळावी यासाठी मुख्यमंत्री, कृषिमंत्री आणि संबंधित विभागांकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात आला. शासनाने सकारात्मक निर्णय घेतल्याने खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. मंजूर निधी थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार असून प्रशासनाने त्यासाठी आवश्यक कार्यवाही तातडीने पूर्ण करावी,” असे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button