गांधी मार्केटमधील तळघर पाणीमुक्त; ड्रेनेज समस्येवर कायमस्वरूपी तोडग्यासाठी महापालिकेची विशेष मोहीम

गांधी मार्केटमधील तळघर पाणीमुक्त; ड्रेनेज समस्येवर कायमस्वरूपी तोडग्यासाठी महापालिकेची विशेष मोहीम
आयुक्त आदित्य जीवणे यांच्या मार्गदर्शनाखाली सलग दोन दिवस १२-१२ तास पाणी उपसा; भूमिगत ड्रेनेज चेंबरचा शोध यशस्वी
जळगाव | प्रतिनिधी
अतिवृष्टीमुळे गांधी मार्केट परिसरातील व्यावसायिक संकुलाच्या तळघरात साचलेल्या पाण्यामुळे व्यापारी आणि नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत होता. या समस्येची गांभीर्याने दखल घेत जळगाव महानगरपालिकेने विशेष मोहीम राबवून तळघरातील पाणी पूर्णपणे उपसण्यात यश मिळविले आहे.

महानगरपालिकेचे आयुक्त आदित्य जीवणे यांच्या मार्गदर्शनाखाली सलग दोन दिवस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी दररोज सुमारे १२ ते १२ तास अथक परिश्रम घेत सक्शन मशीनच्या सहाय्याने तळघरातील साचलेले पाणी बाहेर काढले. त्यामुळे अनेक वर्षांपासून अस्तित्वात असलेल्या व्यावसायिक संकुलातील तळघर पाणीमुक्त झाले आहे.
ड्रेनेज लाईन चोक असल्याचे उघड
तपासणीदरम्यान तळघराखालील भूमिगत ड्रेनेज लाईन चोक झाल्याचे निदर्शनास आले. तळघरात मोठ्या प्रमाणात पाणी असल्याने सुरुवातीला दुरुस्ती करणे शक्य नव्हते. त्यामुळे प्रथम पाणी उपसण्याचे काम पूर्ण करण्यात आले. त्यानंतर रेडिओ डिटेक्शन सिस्टमच्या सहाय्याने भूमिगत ड्रेनेज चेंबरचा यशस्वी शोध घेण्यात आला.
महापालिकेकडून संबंधित चेंबर लवकरच उघडून त्याची साफसफाई करण्यात येणार असून, चोक झालेली ड्रेनेज लाईन सुरळीत करून गांधी मार्केट परिसरातील समस्या कायमस्वरूपी निकाली काढण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
अधिकारी-कर्मचाऱ्यांचे विशेष योगदान
ही मोहीम स्वच्छता अभियंता समीर बोरोले यांच्या अधिपत्याखाली राबविण्यात आली. यामध्ये स्वच्छता मुख्य निरीक्षक, स्वच्छता निरीक्षक, तांत्रिक कर्मचारी, स्वच्छता कर्मचारी तसेच यंत्रसामग्री पथकाने समन्वयाने काम करून तळघरातील पाणी उपसा, भूमिगत चेंबरचा शोध आणि पुढील दुरुस्तीच्या कामाचा मार्ग मोकळा केला.
महानगरपालिका प्रशासनाने नागरिक व व्यापाऱ्यांच्या अडचणी तातडीने सोडविण्यास प्राधान्य दिले असून, गांधी मार्केट परिसरातील ड्रेनेज व्यवस्था लवकरात लवकर सुरळीत करण्यासाठी आवश्यक ती सर्व कार्यवाही करण्यात येत असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले. तसेच या कामात सहकार्य करणाऱ्या व्यापारी व नागरिकांचे महानगरपालिकेने आभार मानले.







