महाडीबीटी 1.0 पोर्टल 15 सप्टेंबरपर्यंत सक्रिय


महाडीबीटी 1.0 पोर्टल 15 सप्टेंबरपर्यंत सक्रिय
अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे प्रलंबित शिष्यवृत्ती अर्ज निकाली काढण्याचे आवाहन
जळगाव, राज्य शासनाच्या सुधारित धोरणानुसार महाडीबीटी प्रणालीचे व्हर्जन २.० कार्यान्वित करण्यात आले आहे. नवीन प्रणालीमध्ये डेटा हस्तांतरण व तांत्रिक सुसूत्रता राखण्यासाठी जुन्या प्रणालीवरील प्रलंबित अर्ज निकाली काढण्याकरिता महाडीबीटी 1.0 पोर्टल कार्यान्वित करण्यात आले आहे.
महाडीबीटी 1.0 प्रणालीवर अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष २०२३-२४, २०२४-२५ व २०२५-२६ मधील काही अर्ज अद्याप विद्यार्थी व महाविद्यालय स्तरावर प्रलंबित आहेत. भारत सरकारच्या सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालयाने भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती योजनेतील २०२५ व त्यापूर्वीचे राज्यस्तरावर प्रलंबित असलेले सर्व पात्र अर्ज निकाली काढण्यासाठी १५ सप्टेंबर २०२६ ही कालमर्यादा निश्चित केली आहे.
त्यानुसार प्रलंबित अर्ज निकाली काढण्यासाठी तसेच मंजूर अर्जांची देयके ऑनलाईन तयार करण्यासाठी महाडीबीटी 1.0 पोर्टल दि. १५ सप्टेंबर २०२६ पर्यंत सक्रिय ठेवण्यात आले आहे.
संबंधित अर्जदार, महाविद्यालये तसेच जिल्ह्यातील सहाय्यक आयुक्त कार्यालयांसाठी सुधारित मार्गदर्शक सूचना (SOP) देण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांनी संबंधित महाविद्यालयांशी संपर्क साधून त्यांच्या स्तरावरील प्रलंबित पात्र अर्ज समाज कल्याण विभागाकडे दि. १५ सप्टेंबर २०२६ पर्यंत सादर करावेत, असे आवाहन सहाय्यक आयुक्त अमोल कुलकर्णी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.







