
महा पोलीस न्यूज । चेतन वाणी । जळगाव जिल्ह्यात अनेक वर्षे पोलीस सेवेत कार्यरत राहून स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून उल्लेखनीय कामगिरी बजावणारे सेवानिवृत्त पोलीस अधिकारी किसनराव नजन पाटील यांनी आता शेतीत एक अनोखा आणि चर्चेचा प्रयोग यशस्वी करून दाखवला आहे. त्यांनी आपल्या नाशिक जिल्ह्यातील घोटी येथील शेतात जपानमधील अत्यंत महागडा आणि दुर्मिळ समजला जाणारा ‘मियाझाकी’ आंबा लावला असून यंदा प्रथमच या झाडांना फळधारणा झाली आहे.
पोलीस दलात कार्यरत असताना धाडसी कारवाया आणि शिस्तप्रिय अधिकारी म्हणून ओळख असलेले किसनराव पाटील हे सुमारे दीड वर्षांपूर्वी सेवेतून निवृत्त झाले. निवृत्तीनंतर त्यांनी आधुनिक आणि प्रयोगशील शेतीकडे वळण्याचा निर्णय घेतला. आपल्या शेतात विविध जातींच्या कलमी आंब्यांची लागवड करत असतानाच त्यांनी एक पाऊल पुढे टाकत थेट दक्षिण भारतातून जपानच्या प्रसिद्ध ‘मियाझाकी’ आंब्याची तीन रोपे आणून लावली.
यंदा प्रथमच झाडांना फळे
काळजीपूर्वक निगा, हवामानानुसार व्यवस्थापन आणि योग्य खतपाण्यामुळे यंदा प्रथमच या झाडांना मोहोर आला आहे. सध्या तीन झाडांवर तब्बल २२ आंबे लागले असून पुढील काही दिवसांत हे आंबे पूर्णपणे परिपक्व होणार आहेत. विशेष म्हणजे महाराष्ट्रात मियाझाकी आंब्याची लागवड फारच कमी प्रमाणात केली जाते. त्यामुळे हा प्रयोग परिसरात चर्चेचा विषय ठरला आहे.
‘एग ऑफ सन’ म्हणून प्रसिद्ध
मियाझाकी आंबा हा मूळ जपानमधील अत्यंत प्रीमियम वाण मानला जातो. त्याचा रंग लालसर-जांभळा असून आकर्षक चमक ही त्याची खासियत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात हा आंबा ‘एग ऑफ सन’ या नावाने ओळखला जातो. गोडवा, सुगंध आणि पोषणमूल्यांमुळे या आंब्याला मोठी मागणी आहे.
आंब्याची किंमत लाखोंमध्ये
या आंब्याची किंमत ऐकून सर्वसामान्यांनाही आश्चर्याचा धक्का बसतो. बाजारात मियाझाकी आंब्याचा दर साधारणपणे अडीच ते तीन लाख रुपये प्रतिकिलोपर्यंत पोहोचतो. देशातील काही मोजक्या शेतकऱ्यांनीच या आंब्याची लागवड केली आहे. मध्यप्रदेशातील जबलपूर परिसरातील एका शेतकऱ्याने तर या आंब्यांच्या सुरक्षेसाठी शिकारी कुत्रे आणि सशस्त्र रक्षक तैनात केल्याची चर्चाही देशभर गाजली होती.
जिद्द, प्रयोगशीलता आणि शेतीप्रेमाचा आदर्श
पोलीस सेवेनंतर निवांत आयुष्य निवडण्याऐवजी आधुनिक शेतीत नवे प्रयोग करण्याचा मार्ग स्वीकारत किसनराव नजन पाटील यांनी अनेकांसमोर वेगळा आदर्श निर्माण केला आहे. पारंपरिक शेतीसोबत उच्च मूल्य असलेल्या फळपिकांकडे वळल्यास शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या मोठा फायदा होऊ शकतो, हे त्यांनी आपल्या प्रयोगातून दाखवून दिले आहे.
किसनराव नजन-पाटील, प्रगतीशील शेतकरी : मो.7350515858





