Other

सेवानिवृत्तीच्या दिवशी पोलिस उपनिरीक्षकांची ११ किलोमीटर धाव

फिटनेस, शिस्त आणि निरोगी जीवनशैलीचा संदेश देण्यासाठी सुमेरसिंह चौहान यांचा प्रेरणादायी उपक्रम

सेवानिवृत्तीच्या दिवशी पोलिस उपनिरीक्षकांची ११ किलोमीटर धाव

फिटनेस, शिस्त आणि निरोगी जीवनशैलीचा संदेश देण्यासाठी सुमेरसिंह चौहान यांचा प्रेरणादायी उपक्रम

जळगाव l प्रतिनिधी l महाराष्ट्र पोलीस दलात दीर्घकाळ प्रामाणिक, शिस्तबद्ध आणि कर्तव्यदक्ष सेवा बजावणारे पोलिस उपनिरीक्षक सुमेरसिंह करमसिंह चौहान हे आपल्या सेवानिवृत्तीच्या दिवशी एक अनोखा आणि प्रेरणादायी उपक्रम राबविणार आहेत. सेवाकार्यातील अखेरचा दिवस संस्मरणीय ठरावा आणि समाजालाही सकारात्मक संदेश मिळावा या उद्देशाने ते शनिवारी, ३० मे रोजी पहाटे ४.४५ वाजता तब्बल ११ किलोमीटर धावणार आहेत.

ही धाव जळगाव येथील पोलिस कवायत मैदानापासून सुरू होऊन अनुभूती शाळा, शिरसोली येथे पोहोचणार असून तेथून पुन्हा पोलिस कवायत मैदानापर्यंत परत येणार आहे. या उपक्रमातून नागरिकांना आरोग्य, शिस्त, नियमित व्यायाम आणि फिटनेसचे महत्त्व पटवून देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.

सेवाकाळातही फिटनेसला प्राधान्य

पोलिस सेवेत कार्यरत असताना सुमेरसिंह चौहान यांनी विविध ठिकाणी उत्कृष्ट कामगिरी करत जनतेचा विश्वास संपादन केला. कर्तव्याबरोबरच शारीरिक तंदुरुस्तीला त्यांनी नेहमीच महत्त्व दिले. सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावरही त्यांनी निवडलेला हा उपक्रम त्यांच्या जिद्दीचा, सकारात्मक दृष्टिकोनाचा आणि निरोगी जीवनशैलीवरील विश्वासाचा प्रत्यय देणारा ठरत आहे.

“वय हा फक्त आकडा”

या उपक्रमामागे समाजात फिटनेसबाबत जागरूकता निर्माण करण्याचा उद्देश असल्याचे चौहान यांनी सांगितले. “वय हा फक्त एक आकडा आहे. इच्छाशक्ती, सातत्य आणि नियमित सराव यांच्या जोरावर कोणतेही ध्येय गाठता येते,” असा संदेश ते आपल्या धावण्याद्वारे देणार आहेत.

नागरिकांना प्रोत्साहनाचे आवाहन

या उपक्रमाचे पोलिस सहकारी, मित्रपरिवार आणि नागरिकांकडून कौतुक होत असून परिसरात याची चर्चा रंगली आहे. “समाजासाठी प्रेरणा निर्माण व्हावी म्हणून मी किमान ११ किलोमीटर धावणार आहे. मला प्रोत्साहन देण्यासाठी पोलिस सहकारी, पत्रकार, मित्रपरिवार, नातेवाईक आणि नागरिकांनी मार्गावर विविध ठिकाणी उपस्थित राहून मला शुभेच्छा द्याव्यात,” असे आवाहन सुमेरसिंह चौहान यांनी केले आहे.

सेवानिवृत्तीच्या दिवशीही फिटनेस आणि सकारात्मकतेचा संदेश देणारा हा उपक्रम अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button