Other

धरणगाव घरफोडी : दोन जणांसह विधी संघर्षित बालक ताब्यात

धरणगाव घरफोडी: दोन जणांसह विधी संघर्षित बालक ताब्यात

75 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत; एलसीबीची कारवाई

धरणगाव प्रतिनिधी शहरात झालेल्या एका  घरफोडीच्या गुन्ह्याचा छडा लावण्यात स्थानिक गुन्हे शाखेला (एलसीबी) यश आले आहे. या कारवाईत दोन सराईत चोरट्यांना अटक करण्यात आली असून, त्यांच्यासोबत असलेल्या एका विधीसंघर्षग्रस्त बालकाला देखील ताब्यात घेण्यात आले आहे. पोलिसांच्या पथकाने संशयितांकडून ७५ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, धरणगाव येथील रहिवासी असलेले फिर्यादी हे आपल्या कुटुंबासह २३ मार्च रोजी देवदर्शनासाठी बाहेरगावी गेले होते. याचाच गैरफायदा घेत अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. चोरट्यांनी घरातील कपाटातून सोने-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण १ लाख ९८ हजार रुपये किमतीचा ऐवज लंपास केला होता. याप्रकरणी ३१ मार्च रोजी धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांना या गुन्ह्याचा समांतर आणि सखोल तपास करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार पोलीस निरीक्षक गायकवाड यांनी तातडीने विशेष पथक तयार करून तपासाची चक्रे फिरवली.
सुरुवातीला घटनास्थळाच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता कोणताही ठोस पुरावा पोलिसांच्या हाती लागला नव्हता. मात्र, पथकाने आपली गोपनीय माहिती यंत्रणा आणि तांत्रिक विश्लेषणाचा अत्यंत कौशल्याने वापर केला. या गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी संशयित आरोपी संदीप थोरात (वय २६, व्यवसाय मजुरी) आणि कार्तिक उर्फ आबा महाजन (वय २०, व्यवसाय मजुरी, दोन्ही राहणार एकता नगर, संजयनगर, धरणगाव) यांच्यासह एका विधीसंघर्षीत बालकाला ताब्यात घेतले.
पोलिसी खाक्या दाखवून कसून चौकशी केली असता, तिघांनीही या घरफोडीच्या गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी दोन्ही मुख्य आरोपींना तात्काळ अटक केली असून, विधीसंघर्षीत बालकाला बालन्याय मंडळासमोर हजर केले आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींच्या ताब्यातून पोलिसांनी ६२ हजार रुपयांची रोकड, ३ हजार रुपये किमतीची ८९ ग्रॅम वजनाची चांदीची लगड आणि १० हजार रुपये किमतीची ३.१२० ग्रॅम वजनाची सोन्याची लगड असा एकूण ७५ हजार रुपयांचा ऐवज हस्तगत केला आहे.
सदरची उल्लेखनीय कामगिरी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते (जळगाव परिमंडळ), चोपडा विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या नेतृत्वात पार पडली. या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक संतोष पवार, पोलीस हेडकॉन्स्टेबल विष्णू बिऱ्हाडे, दीपक माळी, रवींद्र पाटील, पोलीस अंमलदार ईश्वर पाटील, रावसाहेब पाटील आणि महेश सोमवंशी यांच्या पथकाने उत्कृष्ट कामगिरी बजावली.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button