निवृत्तीवेतनधारकांसाठी २० नोव्हेंबरला जळगावात विशेष कार्यशाळा

निवृत्तीवेतनधारकांसाठी २० नोव्हेंबरला जळगावात विशेष कार्यशाळा
ऑनलाईन हयातीचा दाखला सादर करण्यासह डिजिटल लाइफ सर्टिफिकेटबाबत मिळणार मार्गदर्शन
जळगाव, (प्रतिनिधी) : जिल्ह्यातील निवृत्तीवेतनधारकांना डिजिटल लाइफ सर्टिफिकेट अभियानाची माहिती व्हावी तसेच ऑनलाईन हयातीचा दाखला सादर करताना येणाऱ्या तांत्रिक अडचणींचे निराकरण व्हावे, यासाठी जिल्हा कोषागार कार्यालय आणि जिल्ह्यातील निवृत्तीवेतन वितरित करणाऱ्या सर्व बँकांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार, २० नोव्हेंबर रोजी विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
ही कार्यशाळा जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील जिल्हा नियोजन सभागृहात सकाळी १०.३० ते दुपारी २ वाजेपर्यंत होणार आहे. या कार्यशाळेत डिजिटल लाइफ सर्टिफिकेट अभियानाची सविस्तर माहिती देण्यात येणार असून, संबंधित ॲपचा वापर कसा करावा, ऑनलाईन हयातीचा दाखला सादर करण्याची प्रक्रिया आणि ॲप वापरताना उद्भवणाऱ्या तांत्रिक अडचणी कशा दूर कराव्यात, याबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे.
निवृत्तीवेतनधारकांना हयातीचा दाखला ऑनलाईन पद्धतीने सादर करणे अधिक सुलभ व्हावे आणि या प्रक्रियेदरम्यान येणाऱ्या अडचणी दूर व्हाव्यात, हा कार्यशाळेचा मुख्य उद्देश आहे. त्यामुळे जळगाव जिल्ह्यातील जास्तीत जास्त निवृत्तीवेतनधारकांनी या कार्यशाळेला उपस्थित राहून मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी माधव थैल यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.







