PoliticsSocial

अमळनेरचा कत्तलखाना कायमस्वरूपी बंद करा; विहिंप-बजरंग दलाचा आठ दिवसांचा अल्टिमेटम

कारवाई न झाल्यास नगराध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा

अमळनेरचा कत्तलखाना कायमस्वरूपी बंद करा; विहिंप-बजरंग दलाचा आठ दिवसांचा अल्टिमेटम

कारवाई न झाल्यास नगराध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा

अमळनेर, प्रतिनिधी : अमळनेर नगरपरिषदेच्या अधिकृत कत्तलखान्यात वारंवार गोवंश कत्तल होत असल्याच्या तक्रारींची निष्पक्ष चौकशी करून कत्तलखाना कायमस्वरूपी बंद करावा, अशी मागणी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या अमळनेर प्रखंडाच्या वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भात १८ नोव्हेंबर रोजी नगराध्यक्ष तथा मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात आले. प्रशासनाने आठ दिवसांच्या आत ठोस कारवाई करून त्याचा लेखी अहवाल द्यावा, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे.

कत्तलखान्यावर प्रशासनाचे प्रभावी नियंत्रण नसल्याचा आरोप

कत्तलखान्याच्या कामकाजावर नगरपरिषद प्रशासनाचे प्रभावी नियंत्रण नसल्याने गोवंश कत्तलीसंदर्भातील तक्रारी वारंवार समोर येत असल्याचा आरोप संघटनांनी केला आहे. या तक्रारींची तातडीने निष्पक्ष चौकशी करावी. कत्तलखान्यातील परवाने, पशुवैद्यकीय तपासणी, जनावरांची आवक-जावक आणि संबंधित नोंदींची तपासणी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. नियमांचे उल्लंघन आढळल्यास कत्तलखाना चालक आणि संबंधित दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, तसेच कत्तलखान्याचा परवाना रद्द करण्याची प्रक्रिया सुरू करावी, असे निवेदनात म्हटले आहे.

संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या भूमिकेची चौकशी करा

कत्तलखान्याच्या नियंत्रणाची जबाबदारी असलेल्या नगरपरिषद कर्मचारी आणि पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या कर्तव्यपालनाची सखोल चौकशी करावी. निष्काळजीपणा अथवा संगनमत आढळल्यास संबंधितांवर विभागीय व कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून कत्तलखाना बंद करावा आणि संबंधित बांधकामाबाबत नियमानुसार कारवाई करावी, अशी भूमिका संघटनांनी मांडली आहे.

आठ दिवसांत कारवाई न झाल्यास आंदोलन

नगरपरिषद प्रशासनाने आठ दिवसांच्या आत केलेल्या कार्यवाहीचा लेखी अहवाल द्यावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. या कालावधीत कत्तलखाना बंद करण्याबाबत ठोस प्रक्रिया सुरू न झाल्यास नगराध्यक्षांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. अन्यथा विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या वतीने लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.

यावेळी विश्व हिंदू परिषदेचे प्रखंड संयोजक सचिन माळी, प्रखंड मंत्री सचिन चौधरी, बजरंग दलाचे प्रखंड गोरक्षक विश्वनाथ मिस्त्री आणि शहर गोरक्षक स्वप्निल पाटील यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

 

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button