जळगावात घराबाहेर तलवार आणि बंदुकीसह टोळक्याचा धुडगूस; महिलेच्या दिशेने झाडली गोळी
मुलाला जीवे मारण्याची धमकी देत घराबाहेर दहशत; शिवाजीनगरातील घटनेने परिसरात खळबळ

महा पोलीस न्यूज । चेतन वाणी । जळगाव शहरातील शिवाजीनगर परिसरात जुन्या वादातून पाच जणांनी दोन दुचाकींवरून येत एका तरुणाच्या घराबाहेर तलवार आणि धारदार शस्त्रांसह दहशत निर्माण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यावेळी एका महिलेच्या दिशेने बंदुकीतून गोळी झाडण्यात आल्याचा गंभीर आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. मंगळवार दि.१७ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७ ते ७.१५ वाजेच्या सुमारास प्रभात मेडिकलसमोर ही घटना घडली. या प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
जुन्या वादातून निर्माण झाला राग
याबाबत दिलेल्या फिर्यादीनुसार, शिवाजीनगर येथील रहिवासी केयुर पंधारे (वय २४) याने १६ नोव्हेंबर रोजी धनाजी काळे नगर परिसरात घडलेल्या एका वादात मध्यस्थी केली होती. कौशल शर्मा याच्या मावशी सीमा शर्मा आणि मावस बहीण रेवती शर्मा यांच्यासोबत प्रेम प्रविण पाटील याचा किरकोळ कारणावरून वाद झाला होता. या वादाचे रूपांतर शिवीगाळ आणि मारहाणीत झाले.
प्रेम पाटील याने सीमा शर्मा यांच्या हातातील झाडू हिसकावून त्यांना तसेच रेवती शर्मा यांनाही चेहऱ्यावर, डोक्यावर आणि हातावर मारहाण केल्याचा आरोप आहे. यानंतर केयुर पंधारे याने सीमा शर्मा यांना तक्रार देण्यासाठी जळगाव शहर पोलीस ठाण्यात नेऊन मदत केली होती. याचाच राग मनात धरून केयुरला लक्ष्य करण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
दोन दुचाकींवरून आले पाच जण
मंगळवारी सायंकाळी केयुर पिझ्झा आणण्यासाठी स्वातंत्र्य चौक परिसरात गेला होता. त्याचदरम्यान सायंकाळी ७ ते ७.१५ वाजेच्या सुमारास दोन दुचाकींवरून पाच जण शिवाजीनगरातील त्याच्या घराबाहेरील चौकात आले. त्यांनी केयुरच्या नावाने अश्लील शिवीगाळ करत, ‘आता घरात काय लपून बसला आहेस, बाहेर ये, तुला आज जिवंत सोडणार नाही,’ अशा धमक्या दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
या पाच जणांपैकी काळ्या रंगाचा शर्ट घातलेल्या एका व्यक्तीच्या हातात तलवार, तर इतरांकडे धारदार शस्त्रे होती. शस्त्रे उंचावून त्यांनी परिसरात दहशत निर्माण केली. हा प्रकार पाहून केयुरच्या आईने घाबरून घरात जाऊन मुलाला फोन केला. त्यावेळी केयुरने आईला घराबाहेर न येता घरातच थांबण्यास सांगितले.
महिलेच्या दिशेने बंदुकीतून गोळीबार
दरम्यान, एक संशयिताने काही वेळापूर्वी केयुरला फोन करून शिवीगाळ केली होती. ‘तू दादा झाला आहेस का? माझा बाप किंगमेकर आहे. थोड्या वेळात तुझ्या घरी येऊन तुझा मर्डर करतो,’ अशी धमकी दिल्याचे केयुरने आईला सांगितले होते.
यानंतर काही वेळाने केयुरची आई पुन्हा गॅलरीत आली असता, पांढऱ्या रंगाचा शर्ट घातलेल्या जाडसर व्यक्तीने कमरेला लावलेली बंदूक काढून तिच्या दिशेने जीवे मारण्याच्या उद्देशाने गोळी झाडल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. गोळीबारामुळे घाबरलेली महिला घरात पळाली. त्यानंतर पाचही जण दुचाकींवरून घटनास्थळावरून पसार झाले.
सीसीटीव्ही फुटेजमधून संशयितांची ओळख
घटनेनंतर केयुर घरी परतल्यानंतर त्याच्या आईने त्याला संपूर्ण प्रकार सांगितला. त्यानंतर घरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. त्यातून तीन संशयीत आणि अन्य दोन अनोळखी व्यक्ती असल्याचे समोर आल्याचे फिर्यादीत नमूद आहे. या प्रकरणी सुरेखा कैलास पंधारे (वय ५०, रा.शिवाजीनगर, जळगाव) यांनी जळगाव शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. ५ व्यक्तींविरुद्ध कायदेशीर कारवाईची मागणी करण्यात आली आहे.







