आदिवासी विकासाच्या योजना तळागाळापर्यंत पोहोचविण्यावर भर ; जनजातीय गौरव सेवा सप्ताहाचा समारोप

आदिवासी विकासाच्या योजना तळागाळापर्यंत पोहोचविण्यावर भर ; जनजातीय गौरव सेवा सप्ताहाचा समारोप
जळगाव, प्रतिनिधी : क्रांतीसूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त जिल्ह्यात ११ ते १८ नोव्हेंबरदरम्यान राबविण्यात आलेल्या ‘जनजातीय गौरव सेवा सप्ताह-२०२६’चा समारोप १८ नोव्हेंबर रोजी यावल येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयात झाला. आमदार अमोल जावळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमात आदिवासी समाजातील पात्र लाभार्थ्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ देण्यात आला. जिल्ह्यातील १५ तालुक्यांमधील आदिवासी गावे व पाड्यांवर आयोजित ८१ विशेष शिबिरांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
आदिवासी समाजाचा गौरवशाली इतिहास, स्वातंत्र्यलढ्यातील योगदान, सांस्कृतिक वारसा आणि अस्मिता जपण्यासोबतच शासनाच्या कल्याणकारी योजना तळागाळातील लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविणे हा या सप्ताहाचा प्रमुख उद्देश होता.
पाणी, वीज आणि महिला सबलीकरणावर भर
आदिवासीबहुल भागांत स्वच्छ पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी पालकमंत्र्यांनी १२.५ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. वीजपुरवठ्यापासून वंचित असलेल्या पाड्यांमध्ये सौरऊर्जेद्वारे वीज उपलब्ध करून देण्याचे काम प्रस्तावित आहे. महिला बचत गटांच्या वस्तू, हस्तकला, वनोपज आणि खाद्यपदार्थांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी यावल येथे दोन कोटी रुपये खर्चून ‘बहिणाई मॉल’ उभारण्यात येत आहे. या मॉलमध्ये शिलाई मशीन, आधुनिक स्वयंपाकघर आणि विक्रीसाठी स्वतंत्र दालन उपलब्ध असेल, अशी माहिती आमदार अमोल जावळे यांनी दिली.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ नियमित मिळण्यासाठी ई-केवायसी पूर्ण करणे तसेच आधार क्रमांक, बँक खाते आणि मोबाईल क्रमांक संलग्न ठेवणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. आयुष्मान भारत कार्ड वितरणाचे उद्दिष्ट पुढील दीड ते दोन महिन्यांत शंभर टक्के पूर्ण करण्यासाठी गावोगावी शिबिरे आयोजित करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. या कार्डच्या माध्यमातून पाच लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार मिळू शकतात.
लाभार्थ्यांना योजनांचे वाटप; गुणवंतांचा गौरव
समारंभात ९२ महिला बचत गटांना लाभ देण्यात आला. चार लाभार्थ्यांना ट्रॅक्टर, तर १६ आदिवासी शेतकऱ्यांना बियाण्यांचे वाटप करण्यात आले. संजय गांधी निराधार योजनेच्या लाभासह वनपट्टे आणि रेशन कार्डांचे वितरण करण्यात आले. पवित्र पोर्टलद्वारे नियुक्त १६ शिक्षकांचे स्वागत करण्यात आले, तर पुढारी टॅलेंट सर्च परीक्षेतील सहा गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.
आदिवासी समाजातील पारंपरिक वैद्य तसेच वारली चित्रकलेच्या माध्यमातून उद्योजकतेला चालना देणाऱ्या महिला बचत गटाच्या प्रतिनिधींचाही सन्मान करण्यात आला.
आरोग्य तपासणी, रक्तदान आणि जनजागृती उपक्रम
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, इंडियन रेडक्रॉस सोसायटी आणि आरोग्य विभागाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित रक्तदान शिबिरात ३४ जणांनी रक्तदान केले, तर ४० नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. यासोबतच आधार नोंदणी, कृषी मार्गदर्शन, पारंपरिक उपचार, पेसा कायद्याविषयी जनजागृती आणि व्यसनमुक्तीवर आधारित पथनाट्य असे विविध उपक्रम राबविण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रकल्प अधिकारी यांनी केले. यावेळी विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी आणि आदिवासी समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.







