मंत्री गुलाबराव पाटलांचा वारसा चोख सांभाळणार, प्रतापराव पाटील आमदार होणार!

महा पोलीस न्यूज । चेतन वाणी । आगामी काही दिवसात राज्यात विधान परिषद निवडणुकीचा बिगुल वाजण्याची शक्यता आहे. जळगाव जिल्ह्यातील जवळपास सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थेवर महायुतीची सत्ता आहे. सदस्यांचे संख्याबळ पाहता महायुतीचा आमदार होण्याची शक्यता आहे. राज्याचे मुलूख मैदान तोफ आणि जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या राजकारणाचा वारसा सांभाळण्यासाठी युवा नेते प्रतापराव पाटील सज्ज झाले असून विधान परिषदेचे उमेदवार म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात आहे.
राज्यात गेल्या कालखंडात पार पडलेल्या विधानसभा, मनपा, नपा, जिल्हा परिषद निवडणुकीत महायुतीने दमदार यश संपादन केले आहे. नुकतेच विधानमंडळ नियुक्त विधान परिषद सदस्यांच्या निवडीची प्रक्रिया सुरू झाली आहे. सर्व पूर्ण झाल्यानंतर राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधान परिषद निवडणूक होणार असल्याचे बोलले जात आहे. सर्व चर्चा सुरू झाल्यानंतर जिल्ह्यात देखील राजकीय वातावरण तापले आहे.
भावी आमदार म्हणून झळकले बॅनर
महाराष्ट्र राज्याचे मुलुख मैदान तोफ आणि जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे सुपुत्र जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांच्या देखील नावाची चर्चा सुरु झाली आहे. जळगाव जिल्ह्यात प्रतापराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त ठिकठिकाणी फलक उभारण्यात आले असून त्यावर थेट भावी आमदार म्हणून उल्लेख करण्यात आला आहे.
मित्रांची साथ, ज्येष्ठांचे आशीर्वाद
पालकमंत्री गुलाबराव पाटील हे आपल्या व्यस्त दौऱ्यात असताना आणि त्यांच्या निवडणूक प्रचार काळात पडद्यामागून सर्व सूत्रे हाताळणारा चेहरा म्हणजे प्रतापराव पाटील. जळगाव ग्रामीणच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यात त्यांनी आपला जनसंपर्क निर्माण केला आहे. सर्व समाजातील मित्र परिवार आणि ज्येष्ठांचे आशीर्वाद यामुळे प्रतापराव पाटील यांनी विधान परिषद निवडणूक लढवावी अशी जनसामान्य नागरिक व कार्यकर्त्यांची इच्छा आहे.
जिल्ह्याला न्याय देण्याची क्षमता
मंत्री गुलाबराव पाटील हे स्वतः दोन पंचवार्षिक पासून जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री असल्याने त्यांच्या जिल्ह्यातील सर्व विकासकामांची आणि जिल्ह्यातील समस्यांची प्रतापराव पाटील यांना जाणीव आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सदस्यांच्या बळावर महायुतीने संधी दिल्यास विधान परिषद आमदार म्हणून प्रतापराव पाटील हे १०० टक्के विजयी होणार आणि जिल्ह्याला न्याय मिळेल असे राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांचे मत आहे.





