HealthSocial

खेळाडूंच्या दुखापती आणि प्रतिबंधात्मक उपायांवर जळगावात कार्यशाळा

खेळाडूंच्या दुखापती आणि प्रतिबंधात्मक उपायांवर जळगावात कार्यशाळा

ऑर्थोपेडिक तज्ज्ञ डॉ. मनीष चौधरी यांचे मार्गदर्शन; हाडांच्या घनतेची मोफत तपासणी

जळगाव (प्रतिनिधी) : खेळाडूंना खेळताना होणाऱ्या दुखापती, त्यावरील प्रतिबंधात्मक उपाय आणि दुखापतीनंतर पुन्हा सुरक्षितपणे मैदानात परतण्याच्या प्रक्रियेची माहिती मिळावी, यासाठी जळगाव जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशन आणि ए. पी. स्पोर्ट्स क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. युनिक अकॅडमीच्या सभागृहात झालेल्या या कार्यशाळेला जिल्ह्यातील अनेक खेळाडूंनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी प्रसिद्ध अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. मनीष चौधरी, महाराष्ट्र राज्य ॲथलेटिक्स असोसिएशनचे उपाध्यक्ष राजेश जाधव, नायब तहसीलदार अनिल पठाडे, जळगाव जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनचे कार्याध्यक्ष डॉ. पी. आर. चौधरी, उपाध्यक्ष डॉ. विजय पाटील, जळगाव जिल्हा शारीरिक शिक्षण व क्रीडा शिक्षक महासंघाचे कार्याध्यक्ष डॉ. प्रशांत कोल्हे, युनिक अकॅडमीचे संचालक किशोर सोनवणे, चॅलेंज फाउंडेशनचे संचालक किरण माळी आणि ए. पी. स्पोर्ट्स क्लबच्या सचिव वैशाली पठाडे उपस्थित होते.

डॉ. मनीष चौधरी यांनी खेळादरम्यान होणाऱ्या विविध दुखापती आणि त्या टाळण्यासाठी घ्यावयाची काळजी याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. सरावापूर्वी वॉर्म-अप करणे, स्ट्रेचिंगचे महत्त्व, खेळताना योग्य तंत्राचा वापर, दुखापत झाल्यास तातडीने करावयाचे प्रथमोपचार आणि दुखापतीतून पूर्णपणे बरे झाल्यानंतर सुरक्षितपणे मैदानात पुनरागमन कसे करावे, याबाबत त्यांनी माहिती दिली.

यासोबतच हाडांची रचना, सरावाचे योग्य नियोजन आणि खेळाडूंचा संतुलित आहार या विषयांवरही त्यांनी मार्गदर्शन केले. प्रश्नोत्तराच्या सत्रात खेळाडूंनी विचारलेल्या शंकांचे निरसन करण्यात आले.

हाडांच्या घनतेची मोफत तपासणी

कार्यशाळेच्या निमित्ताने खेळाडूंसाठी हाडांची घनता (बोन मिनरल डेन्सिटी) तपासण्याची मोफत सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. या तपासणीद्वारे हाडांची मजबुती आणि संभाव्य समस्यांबाबत माहिती घेण्याची संधी खेळाडूंना मिळाली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ए. पी. स्पोर्ट्स क्लबचे अध्यक्ष तथा जळगाव जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनचे मुख्य प्रशिक्षक अनिल पठाडे यांनी केले, तर आभार प्रदर्शन डॉ. पी. आर. चौधरी यांनी केले. कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनासाठी निलेश वानखेडे, योगेश जोशी, अविनाश पाटील आणि आदित्य पाटील यांनी परिश्रम घेतले.

 

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button