CrimeSocial

पातोंडा परिसरात केबल चोरट्यांचा धुमाकूळ; पोलीस, महसूल प्रशासनासह लोकप्रतिनिधींबद्दल शेतकऱ्यांमध्ये नाराजी

पातोंडा परिसरात केबल चोरट्यांचा धुमाकूळ; पोलीस, महसूल प्रशासनासह लोकप्रतिनिधींबद्दल शेतकऱ्यांमध्ये नाराजी

अमळनेर : तालुक्यातील पातोंडा आणि दहिवद परिसरातील शेतशिवारात विहिरी व बोअरवेलच्या केबल चोरीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. वारंवार चोरीच्या घटना घडूनही चोरट्यांना पकडण्यात यश येत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये पोलीस यंत्रणेबद्दल तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. केबल चोरीसोबतच गुरे चोरीच्या घटनाही वाढल्याने शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे.

शेतकऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पातोंडा आणि दहिवद परिसरात रब्बी हंगामातील पिकांना पाणी देण्यासाठी दिवसा वीज उपलब्ध करून दिली जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना रात्री शेतात जाण्याची आवश्यकता राहत नाही. याच संधीचा फायदा घेत चोरट्यांनी शेतातील विहिरी आणि बोअरवेलमधील महागड्या केबल चोरण्याचा सपाटा लावला आहे. चोरी केलेल्या केबलमधील तांबे काढण्यासाठी चोरटे शेतातील ठिबक सिंचनाच्या नळ्या पेटवून त्याच आगीत केबल वितळवत असल्याचेही समोर आले आहे.

गेल्या दोन महिन्यांपासून या परिसरात अशा चोरीच्या घटना घडत आहेत. यासंदर्भात संबंधित शेतकऱ्यांनी पोलीस, महसूल प्रशासन तसेच लोकप्रतिनिधींकडे तक्रारी केल्या आहेत. मात्र, तरीही चोरीच्या घटनांना आळा बसत नसल्याने शेतकऱ्यांचा प्रशासनावरील विश्वास कमी होत चालला आहे. विशेष म्हणजे, गेल्या सहा दिवसांत दोन वेळा चोरीच्या घटना घडल्या आहेत. पिकांना पाणी देणे आवश्यक असल्याने शेतकऱ्यांनी उधारीने नवीन केबल खरेदी करून बसविल्या; मात्र चोरट्यांनी पुन्हा त्याच नवीन केबलवर डल्ला मारला. त्यामुळे शेतकरी अधिकच संतप्त झाले आहेत.

या प्रकारामुळे संतप्त शेतकरी प्रशासनाच्या निषेधार्थ अमळनेर-चोपडा महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्याच्या तयारीत होते. याची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम आणि उपविभागीय पोलीस अधिकारी विनायक कोते यांनी घटनास्थळी धाव घेत संबंधित शेतकऱ्यांची भेट घेतली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून चोरट्यांचा बंदोबस्त करण्याचे आश्वासन दिले. तसेच रात्रीच्या वेळी पोलीस गस्त वाढविण्यात येईल, असेही सांगितले.

चोरीच्या घटनांमुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान

सध्या शेतकऱ्यांवर दुष्काळाचे सावट असून, या संकटातून सावरण्यासाठी शेतकरी प्रयत्नशील आहेत. अशा परिस्थितीत शेतातील सिंचन यंत्रणा, विद्युत केबल आणि गुरे चोरीला जाणे शेतकऱ्यांसाठी मोठे आर्थिक संकट ठरत आहे. हिवाळ्याची सुरुवात होताच चोरट्यांचा वावर वाढत असल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केली आहे.

चोरट्यांना पकडण्यात पोलीस यंत्रणा अपयशी ठरत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. तसेच लोकप्रतिनिधींकडूनही या गंभीर प्रश्नाकडे दुर्लक्ष होत असल्याची भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली. त्यामुळे न्याय मागायचा तरी कुणाकडे, असा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाला आहे.

या पार्श्वभूमीवर रात्रीच्या वेळी नियमित पोलीस गस्त घालावी, केबल चोरट्यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा आणि चोरीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी, अशा मागण्यांचे निवेदन संतप्त शेतकऱ्यांनी पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम आणि उपविभागीय पोलीस अधिकारी विनायक कोते यांना दिले आहे. चोरीच्या घटनांना आळा न बसल्यास जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे दाद मागण्याचा इशाराही शेतकऱ्यांनी दिला आहे.

 

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button