
जळगावच्या प्रमोद अण्णा वाणी यांना ‘महाराष्ट्र भूषण जीवन गौरव पुरस्कार’
शेगाव येथे राज्यस्तरीय पर्यावरण परिषदेत मान्यवरांच्या हस्ते सन्मान; सामाजिक कार्याची दखल
जळगाव (प्रतिनिधी) : जळगाव येथील सामाजिक कार्यकर्ते तथा भारतीय जनता पार्टी वाहतूक आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रमोद अण्णा वाणी (आहेर) यांना ‘महाराष्ट्र भूषण जीवन गौरव पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले. शेगाव येथील वर्धमान जैन सभागृहात २२ नोव्हेंबर २०२६ रोजी आयोजित राज्यस्तरीय पर्यावरण परिषदेत हा सन्मान प्रदान करण्यात आला.
निसर्ग मित्र समिती, धुळे आणि मातृ पितृ आचार्य स्मृती जागरण सेवाभावी संस्था, कावठे, ता. साक्री, जि. धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने या परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे उद्घाटन प्राचार्य बी. एस. पाटील यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले.
निसर्ग मित्र समितीचे संस्थापक डॉ. प्रेमकुमार अहिरे, मातृ पितृ आचार्य स्मृती जागरण सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य दादासाहेब बी. एस. पाटील, संतोष आबा पाटील, डॉ. विनोद पवार (जळगाव), विश्वासराव पगार (मालेगाव) आणि विलासराव देसले (साक्री) यांची प्रमुख उपस्थिती होती.
डॉ. प्रेमकुमार अहिरे यांच्या प्रास्ताविकानंतर संतोष आबा पाटील, डॉ. विनोद पवार आणि उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रमोद अण्णा वाणी यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. विविध सामाजिक आणि संघटनात्मक क्षेत्रांत त्यांनी केलेल्या कार्याची दखल घेऊन त्यांना हा सन्मान देण्यात आला.
प्रमोद अण्णा वाणी हे भारतीय जनता पार्टी वाहतूक आघाडीचे जिल्हाध्यक्ष असून, नेताजी सुभाषचंद्र बोस रिक्षा युनियनचे संस्थापक जिल्हा उपाध्यक्ष आहेत. तसेच श्री छत्रपती शाहू महाराज बहुउद्देशीय संस्था, शाहूनगर, जळगावचे सदस्य, कर्तव्यदक्ष पोलीस मित्र फाउंडेशनच्या महाराष्ट्र कोअर कमिटीचे सदस्य आणि जळगाव जिल्हा कार्याध्यक्ष म्हणून ते कार्यरत आहेत. याशिवाय भगवे वादळ चालक-मालक विद्यार्थी वाहतूक संघटनेचे जळगाव कार्याध्यक्ष म्हणूनही ते जबाबदारी सांभाळत आहेत. गांधी पीस फाउंडेशन, नेपाळ यांच्यातर्फे त्यांना मानद डॉक्टरेटनेही सन्मानित करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाला प्राचार्य महेश पाटील, डी. बी. पाटील, प्राचार्य सतीश पाटील, संजीरी फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. ईसा शेख, लॉर्ड बुद्धा टीव्हीचे पत्रकार मनीष खर्चे यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.
प्रमोद अण्णा वाणी यांना ‘महाराष्ट्र भूषण जीवन गौरव पुरस्कार’ मिळाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत असून, पुढील सामाजिक वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या जात आहेत.







