
प्रत्येक जिल्ह्यात स्वतंत्र सहसंचालक कार्यालय सुरू करण्याचा प्रस्ताव
उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची माहिती; जळगावात उच्च शिक्षण विभागाच्या अत्याधुनिक इमारतीचे उद्घाटन
जळगाव (प्रतिनिधी) : राज्यातील महाविद्यालयांचे प्रशासकीय कामकाज अधिक गतिमान, सुलभ आणि पारदर्शक करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात स्वतंत्र सहसंचालक कार्यालय सुरू करण्याचा प्रस्ताव वित्त विभागाकडे सादर करण्यात आला आहे. उच्च शिक्षण विभागाच्या नवीन सॉफ्टवेअरमुळे शासनाशी संबंधित ९८ ते ९९ टक्के कामकाज ऑनलाइन पद्धतीने होत असून, राज्यातील सुमारे सहा हजार महाविद्यालयांच्या कामकाजाला अधिक गती देण्याचा शासनाचा प्रयत्न असल्याची माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.
जळगाव येथे विभागीय सहसंचालक, उच्च शिक्षण कार्यालयाच्या नूतन अत्याधुनिक इमारतीचे उद्घाटन मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. खासदार स्मिता वाघ, आमदार सुरेश भोळे, महापौर दीपमाला काळे, जिल्हाधिकारी रोहन घुगे, उच्च शिक्षण विभागाचे उपसचिव अशोक मांडे, सहसंचालक डॉ. पराग मसराम, कार्यकारी अभियंता आर. डी. पाटील आणि उपविभागीय अभियंता एस. एल. देवरे उपस्थित होते.
महाराष्ट्रातील उच्च शिक्षण विभागाच्या सहसंचालक कार्यालयाची ही पहिलीच अत्याधुनिक व प्रशस्त इमारत असल्याचे सांगून मंत्री पाटील म्हणाले की, ऑनलाइन प्रणालीमुळे महाविद्यालयांची वैद्यकीय देयके, निवृत्तिवेतन प्रस्ताव आणि प्राध्यापकांचे वेतन सुरू करण्यासारखी कामे सुलभ झाली आहेत. मात्र, महाविद्यालयांशी संबंधित प्रशासकीय कामकाज अधिक वेगाने होण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात सहसंचालक कार्यालय असणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने शासन स्तरावर प्रयत्न सुरू आहेत.
महाविद्यालयांनी सामाजिक उत्तरदायित्व जपत गरजू विद्यार्थ्यांसाठी मोफत भोजन व्यवस्था सुरू करावी. विद्यार्थ्यांना शुद्ध पिण्याचे पाणी, वॉटर फिल्टर आणि इतर मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. शहरी व ग्रामीण महाविद्यालयांनी परस्पर समन्वयातून विद्यार्थ्यांना मदतीचे जाळे निर्माण करावे. प्राचार्यांनी विद्यार्थ्यांना कुटुंबातील सदस्य समजून या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले.
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पाणी शुद्धीकरण आणि सांडपाण्याच्या पुनर्वापराचे उपक्रम राबविण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. जानेवारीनंतर दुष्काळाची तीव्रता वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन विद्यार्थ्यांसह संबंधित घटकांना आवश्यक मदत उपलब्ध करून देण्यासाठी आतापासून नियोजन करावे. या कामासाठी महाविद्यालयांना सहकार्य केले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
विद्यार्थ्यांच्या मानसिक स्वास्थ्यासाठी समुपदेशन
विद्यार्थ्यांचे मानसिक स्वास्थ्य जपण्यासाठी आणि त्यांच्यातील एकलकोंडेपणा दूर करण्यासाठी पुणे येथे प्राध्यापकांसाठी मोफत समुपदेशन प्रशिक्षण सुरू करण्यात आले आहे. मुलींच्या मोफत शिक्षणाच्या धर्तीवर एकल विद्यार्थ्यांसाठीही विशेष योजना राबविण्याचा शासन स्तरावर विचार सुरू असून, त्यासाठी आवश्यक माहिती संकलित करण्याचे निर्देश देण्यात आल्याचे मंत्री पाटील यांनी सांगितले.
महाविद्यालयांच्या खात्यांमध्ये शिष्यवृत्ती व शुल्क प्रतिपूर्तीचा प्रलंबित निधी वर्षानुवर्षे पडून आहे. या निधीचा वापर करता येत नसल्याने नियमानुसार परवानगी घेऊन तो वसतिगृहे, स्वच्छतागृहे आणि अन्य मूलभूत सुविधांच्या दुरुस्तीसाठी वापरण्याबाबत कार्यवाही करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
उच्च शिक्षण विभागाची प्रशासकीय यंत्रणा अधिक सक्षम करताना विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित, मानसिक स्वास्थ्य आणि महाविद्यालयांतील मूलभूत सुविधांना प्राधान्य देण्यात येणार आहे. यावेळी मंत्री पाटील यांनी विविध महाविद्यालयांच्या समस्या जाणून घेत त्या सोडविण्याची ग्वाही दिली. नूतन इमारतीची पाहणी करून त्यांनी समाधान व्यक्त केले.
कार्यक्रमाला विविध महाविद्यालयांचे प्राचार्य, प्राध्यापक तसेच शिक्षण विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.







