
जळगावच्या आकांक्षा म्हेत्रेची ट्रॅक सायकलिंगमध्ये दुहेरी रौप्यपदकाची कमाई
ऑल इंडिया इंटर युनिव्हर्सिटी स्पर्धेत पुणे विद्यापीठाचे प्रतिनिधित्व; ‘केरिन’ प्रकारात चौथे स्थान
जळगाव (प्रतिनिधी) : पंजाबमधील अमृतसर येथे झालेल्या ऑल इंडिया इंटर युनिव्हर्सिटी ट्रॅक सायकलिंग चॅम्पियनशिप २०२६ स्पर्धेत जळगावची सायकलपटू आकांक्षा म्हेत्रे हिने दोन रौप्यपदके पटकावून उल्लेखनीय कामगिरी केली. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करताना तिने राष्ट्रीय स्तरावर आपल्या कौशल्याची छाप पाडली.
गुरू नानक देव विद्यापीठात १८ ते २१ नोव्हेंबरदरम्यान या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी मुलींच्या वैयक्तिक टाइम ट्रायल प्रकारात आकांक्षाने वेगवान कामगिरी करत रौप्यपदक जिंकले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी झालेल्या टीम स्प्रिंट प्रकारातही तिने आपल्या संघासह दुसरे रौप्यपदक मिळवले.
स्पर्धेच्या अखेरच्या दिवशी झालेल्या केरिन (Keirin) प्रकारात आकांक्षाने अंतिम फेरीपर्यंत मजल मारली. अटीतटीच्या लढतीत तिला चौथ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. त्यामुळे तिचे तिसरे पदक थोडक्यात हुकले.
आकांक्षा ही जैन इरिगेशनचे सहकारी जी. एम. म्हेत्रे यांची कन्या आहे. तिच्या या यशाबद्दल जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन आणि सहव्यवस्थापकीय संचालक अजित जैन यांनी विशेष कौतुक केले. राष्ट्रीय स्तरावर दोन रौप्यपदके मिळवून जळगावचा आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा नावलौकिक वाढवल्याबद्दल आकांक्षाचे क्रीडा क्षेत्रातून अभिनंदन होत आहे.







