विधान परिषद निवडणूक : जळगाव जिल्ह्यात दोन दिवस ‘ड्राय डे’
उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर जिल्हाधिकार्यांकडून सुधारित आदेश जारी

महा पोलीस न्यूज । चेतन वाणी । महाराष्ट्र विधानपरिषद स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यात कोरडे दिवस (Dry Day) जाहीर करण्यात आले आहेत. जळगाव जिल्हा मद्यविक्री असोसिएशनने मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठात दाखल केलेल्या याचिकेनंतर, न्यायालयाने पूर्व आदेशाला स्थगिती देत सुधारित आदेश काढण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार जळगावचे जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी आज, १६ जून २०२६ रोजी मद्यविक्री बंदीबाबतचा सुधारित आदेश जारी केला आहे.
निवडणूक प्रक्रिया खुल्या, मुक्त आणि निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी तसेच जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी लोकप्रतिनिधित्व अधिनियम १९५१ आणि महाराष्ट्र दारुबंदी कायदा १९४९ मधील तरतुदींनुसार हा निर्णय घेण्यात आला आहे.
मद्यविक्री बंदची वेळ आणि तारीख
१८ जून २०२६ (मतदानाचा दिवस) : संपूर्ण जळगाव जिल्ह्यात सकाळी ८:०० वाजेपासून ते सायंकाळी ४:०० वाजेपर्यंत सर्व मद्यविक्री दुकाने बंद राहतील.
२२ जून २०२६ (मतमोजणीचा दिवस) : संपूर्ण जळगाव जिल्ह्यात सकाळी ८:०० वाजेपासून ते मतमोजणीची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत मद्यविक्रीस पूर्णपणे बंदी असेल.
कडक कारवाईचा इशारा
जिल्हाधिकार्यांनी स्पष्ट केले आहे की, जिल्ह्यातील सर्व घाऊक (Wholesale) आणि किरकोळ (Retail) मद्यविक्री अनुज्ञप्तीधारकांनी या आदेशाचे काटेकोरपणे पालन करणे बंधनकारक आहे. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या मद्यविक्रेत्यांवर महाराष्ट्र दारुबंदी कायदा १९४९ अंतर्गत अत्यंत कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.






