SocialSpecial

आईचा काळजाचा तुकडा गर्दीत हरवला, शहर पोलिसांनी शोधून दिला!

दिवाळीच्या गर्दीत अर्धा तास शोधमोहीम; आईच्या डोळ्यांत तरळले आनंदाश्रू

महा पोलीस न्यूज । चेतन वाणी । दिवाळी आणि भाऊबीजेच्या सणानिमित्त जळगाव शहरातील बाजारपेठांमध्ये नागरिकांची मोठी गर्दी होत आहे. विशेषतः महात्मा फुले मार्केट परिसरात खरेदीसाठी नागरिकांची झुंबड उडत आहे. अशाच गर्दीत आईचा हात सुटल्याने अवघ्या चार वर्षांची चिमुकली हरवली. काही क्षणांतच आईच्या काळजाचा ठोका चुकला. डोळ्यांत अश्रू आणि मनात प्रचंड भीती घेऊन ती आपल्या लाडक्या लेकीचा शोध घेत होती. मात्र, याचवेळी कर्तव्यावर असलेल्या जळगाव शहर पोलिसांनी दाखविलेल्या तत्परतेमुळे चिमुकली सुखरूप आईच्या कुशीत परतली. पोलिसांच्या या माणुसकीपूर्ण कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी सायंकाळी सुमारे ७ वाजेच्या सुमारास शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सागर शिंपी यांच्या आदेशानुसार ग्रेड पोलीस उपनिरीक्षक जमशेर तडवी, रशीद खान, हवालदार राजीव जाधव आणि शैलेंद्र बाविस्कर हे टॉवर चौक ते प्रकाश मेडिकल परिसरात पायी पेट्रोलिंग करत होते.

आईच्या डोळ्यात अश्रू, पोलिसांची धाव
पथकाला महात्मा फुले मार्केटच्या गेट क्रमांक ३ जवळ एक महिला रडताना त्यांना दिसली. पोलिसांनी तत्काळ तिच्याजवळ जात आस्थेवाईकपणे विचारपूस केली. त्यावेळी गर्दीत आपल्या हाताला धरून असलेली चार वर्षांची मुलगी अचानक हात सोडून कुठेतरी निघून गेली असून, ती बेपत्ता झाल्याचे महिलेने सांगितले. सणासुदीच्या गर्दीत चिमुकली हरवल्याने आईची अवस्था अत्यंत बिकट झाली होती.

पोलिसांची चार दिशांनी शोधमोहीम
महिलेची व्यथा समजताच पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता शोधमोहीम सुरू केली. चारही पोलीस अधिकारी व कर्मचारी वेगवेगळ्या दिशांनी रवाना झाले. संपूर्ण परिसर पिंजून काढत चिमुकलीचा शोध सुरू झाला. सुमारे अर्धा तास अथक शोध घेतल्यानंतर मार्केटच्या मागील बाजूस एका दुकानाजवळ ही चिमुकली उभी असल्याचे पोलिसांना आढळून आले.

पोलिसांनी तिला सुखरूप ताब्यात घेत आईकडे आणले. आपल्या काळजाचा तुकडा पुन्हा डोळ्यांसमोर पाहताच आईच्या जीवात जीव आला. मुलीला कुशीत घेताच तिच्या डोळ्यांतून आनंदाश्रू ओघळू लागले. काही वेळापूर्वी चिंतेने व्याकूळ झालेल्या आईच्या चेहऱ्यावर पुन्हा समाधानाचे हास्य फुलले.

खाकी वर्दीतील माणुसकीचा हळवा स्पर्श
संबंधित महिलेचे सासर यावल तालुक्यात असून, ती माहेरी जळगाव येथे आली होती. सणाच्या आनंदात बाजारपेठेत खरेदीसाठी आलेल्या या कुटुंबावर काही क्षणांसाठी मोठे संकट ओढवले होते. मात्र, पोलिसांच्या सतर्कतेमुळे आणि संवेदनशीलतेमुळे एका आईची तिच्या लेकीशी पुन्हा भेट झाली.

सणासुदीच्या काळात कायदा व सुव्यवस्था राखण्यासोबतच नागरिकांच्या सुरक्षेची जबाबदारी पार पाडणाऱ्या पोलिसांनी या प्रसंगात केवळ कर्तव्य बजावले नाही, तर एका आईच्या काळजातील वेदनाही समजून घेतल्या. पोलिसांच्या या तत्परतेमुळे एका कुटुंबाची दिवाळी पुन्हा आनंदाने उजळली.

कधी दंगलीत कायदा-सुव्यवस्था, कधी गुन्हेगारांचा पाठलाग, तर कधी हरवलेल्या चिमुकलीला आईच्या कुशीत पोहोचविण्याची जबाबदारी… खाकी वर्दीच्या मागे असलेली माणुसकी अशाच प्रसंगांतून पुन्हा पुन्हा अधोरेखित होते.

 

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button