
गावठी पिस्तूल आणि जिवंत काडतुसांसह तरुणाला अटक
चाळीसगाव पोलिसांची धडक कारवाई
चाळीसगाव प्रतिनिधी – चाळीसगाव शहर पोलीसांनी केलेल्या तात्काळ आणि प्रभावी कारवाईत एका तरुणास गावठी पिस्तूल व जिवंत काडतूसांसह पकडण्यात आले आहे. ही कारवाई १२ ऑक्टोबर रोजी पहाटे अडीच वाजेच्या सुमारास छाजेड ऑईल मिलच्या पाठीमागील रस्त्यावर करण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस निरीक्षक अमितकुमार मनेळ यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, एक इसम घाटरोड ते हुडको त्रिमूर्ती बेकरीकडे जाणाऱ्या रस्त्यावर गावठी कट्टा घेऊन येणार आहे. त्यानुसार पोलिसांनी त्या ठिकाणी सापळा रचला. काही वेळाने एक संशयित इसम त्या मार्गाने जाताना दिसला. पोलिसांनी तत्काळ घेराव घालून त्याला ताब्यात घेतले.
पंचासमक्ष चौकशी केल्यावर त्याने आपले नाव मयूर राजू मोरे (रा. प्रभात गल्ली, चाळीसगाव) असे सांगितले. त्याची अंगझडती घेतल्यावर त्याच्या कमरेला शर्टाच्या आत लपवलेला सुमारे ३२ हजार रुपये किमतीचा गावठी पिस्तूल, त्यासोबत मॅगझीन आणि दोन जिवंत राऊंड मिळून आले. पोलिसांनी जागेवरच पंचनामा करून शस्त्र व दारुगोळा जप्त केला.
ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक सौ. कविता नेरकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी विजयकुमार ठाकूरवाड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या मोहिमेत पोउपनिरीक्षक गणेश सायकर, पोहे समीर पाटील, पोका निलेश पाटील, रवींद्र बच्छे, राकेश महाजन, केतन सूर्यवंशी, नरेंद्र चौधरी, ज्ञानेश्वर पाटोळे, कल्पेश पगारे, विलास पवार आणि गोपाल पाटील यांचा सहभाग होता.
या प्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ४३९/२०२५ नोंदवण्यात आला असून, भारतीय हत्यार प्रतिबंध कायदा कलम ३/२५ सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७(१)(३) व १३५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पीएसआय गणेश सायकर करीत आहेत.






