Crime

रावेरमध्ये गावठी कट्टा व दोन जिवंत काडतुसांसह तरुणाला अटक

रावेरमध्ये गावठी कट्टा व दोन जिवंत काडतुसांसह तरुणाला अटक

बसस्थानक परिसरात संशयास्पद हालचाली; गुन्हे शोध पथकाची कारवाई

रावेर | प्रतिनिधी

रावेर शहरातील बसस्थानकाच्या मागील बाजूस असलेल्या छोरीया मार्केट परिसरात गावठी कट्टा घेऊन संशयास्पदरीत्या फिरणाऱ्या तरुणाला रावेर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने अटक केली. कृष्णा दतु पाटील (वय २०, रा. रोकडा हनुमान मंदिर नगर, रावेर) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याच्याकडून सुमारे २५ हजार रुपये किमतीचा देशी बनावटीचा गावठी कट्टा आणि एक हजार रुपये किमतीचे दोन जिवंत काडतूस असा एकूण २६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

गुप्त माहितीवरून सापळा

रावेर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाला गुरुवारी गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, रावेर बसस्थानकाच्या मागे छोरीया मार्केटजवळ एक इसम शस्त्र बाळगून संशयास्पदरीत्या फिरत आहे. माहितीची खातरजमा करण्यासाठी पोलिस पथकाने दुपारी संबंधित परिसरात धाव घेतली.

यावेळी छोरीया मार्केटकडे जाणाऱ्या रस्त्यावर राखाडी रंगाचा फुलबाह्यांचा शर्ट व निळ्या रंगाची जिन्स पँट परिधान केलेला तरुण पोलिसांच्या निदर्शनास आला. पोलिस पथकाला पाहताच त्याच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी त्याला ताब्यात घेत पंचांसमक्ष अंगझडती घेतली.

कट्टा व दोन काडतुसे जप्त

अंगझडतीदरम्यान त्याच्याजवळ लोखंडी धातूचा तपकिरी रंगाचा देशी बनावटीचा गावठी कट्टा आढळून आला. तसेच त्याच्याकडून दोन जिवंत काडतुसेही मिळून आली. पोलिसांनी गावठी कट्टा व काडतुसे ताब्यात घेत संशयित कृष्णा पाटील याला अटक केली.

या प्रकरणी पोलिस कॉन्स्टेबल सुकेश तडवी यांनी सरकारतर्फे फिर्याद दिली असून रावेर पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३९८/२०२६, भारतीय हत्यार कायदा कलम ३ सह २५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शस्त्र कोठून आले? पोलिसांचा तपास सुरू

संशयिताकडे गावठी कट्टा आणि जिवंत काडतुसे कोठून आली, त्याने हे शस्त्र कोणाकडून व कोणत्या कारणासाठी खरेदी केले, तसेच या प्रकरणात त्याच्यासोबत आणखी कोणी साथीदार आहे का, याचा पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे.

वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई

ही कारवाई पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलिस अधीक्षक संदीप गावीत व फैजपूर विभागाचे पोलिस उपअधीक्षक अनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली रावेर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संदीप पाटील, सहायक पोलिस निरीक्षक हरिदास बोवरे तसेच गुन्हे शोध पथकातील पोलिस हेड कॉन्स्टेबल समाधान ठाकूर, पोलिस कॉन्स्टेबल सुकेश तडवी, श्रीकांत कव्हाण, विकार शेख, प्रमोद पाटील, विशाल पाटील व संभाजी विजागरे यांनी केली.

 

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button